लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : कृषी विभाग आणि आत्माच्यावतीने येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर पाच दिवसीय कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचा प्रचार व प्रसार करण्याकरिता संबंधित विभाग कमी पडल्यामुळे शेतकऱ्यांनी याकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. या महोत्सवात मिळत असलेला अत्यल्प प्रतिसाद पाहता स्टॉलधारकांनी अल्पावधीतच आपला गाशा गुंडाळून गावचा रस्ता धरला. त्यामुळे हा महोत्सव केवळ शासनाच्या निधीची उधळपट्टी करणाराच ठरल्याची ओरड होत आहे.पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर कृषी विभाग व आत्मा यांच्या वतीने ५ ते ९ जानेवारी या कालावधीत कृषी महोत्सवाचे मोठ्या थाटात आयोजन करण्यात आले होते. शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांची माहिती मिळावी, इतर शेतकऱ्यांपासून प्रेरणा घेऊन आपलीही समृद्धी साधावी तसेच धान्य व भाजीपाला उत्पादनाची माहिती आणि विक्री व्हावी, त्यांना ज्येष्ठ कृषी तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभावे, आदी सर्व उद्देश डोळ्यांसमोर ठेवून शासनाने लाखो रुपयांचा खर्च या महोत्सवाच्या आयोजनावर केला. इतकेच नव्हे, तर या महोत्सवाच्या ठिकाणी काही खासगी स्टॉल्सही लावण्यात आले होते. अनेकांनी उत्पादित वस्तूंची विक्री करण्याच्या हेतूने स्टॉल लावण्यात आल्याने आयोजकांनी त्यांना भाडेही आकारले होते. पण, संबंधित विभागाची उदासिनता आणि प्रचार-प्रसाराकडे केलेले दुर्लक्ष, यामुळे पहिल्या दिवशीपासूनच महोत्सवाचा बार फुसका ठरला.महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे अर्थ, नियोजन व वित्तमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधीही उपस्थित होते. उद्घाटन समारंभालाच रिकाम्या खुर्च्या पहाव्या लागल्या. त्यानंतर मात्र दिवसेंदिवस महोत्सवातील उत्साह व गर्दी ओसरत गेल्याने अखेरच्या दिवशीपर्यंत महोत्सवात उपस्थितीला दुष्काळाच्याच झळा सोसाव्या लागल्या. आयोजनावरील खर्च पाण्यात गेल्याचेच यातून सिद्ध झाले.दुष्काळी परिस्थितीत महोत्सवावर उधळपट्टीयावर्षी पावसाने हुलकावणी दिल्याने जिल्ह्यातील तीन तालुक्यांत दुष्काळजन्य परिस्थिती शासनाकडून जाहीर करण्यात आली असली तरी इतर तालुक्यातही तीच परिस्थिती आहे. सोबतच राज्यातीलही बहुतांश भागात शेतकºयांना दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहे. असे असतानाही शासनाकडून कृषी महोत्सवाच्या आयोजनाचा सपाटा सुरू आहे. पण, ‘ज्यांचे पोटच रिकामे आहे त्यांना पिझ्झा, बर्गरचा काय उपयोग’ अशा उपहासात्मक प्रतिक्रिया आता व्यक्त होऊ लागल्या आहेत.निम्म्यापेक्षा अधिक स्टॉल रिकामेचपोलीस मुख्यालयाच्या मैदानावरील कृषी महोत्सवाच्या आयोजनाकरिता लाखो रुपयांचा खर्च करुन मोठमोठे मंंडप उभारण्यात आले होते. याकरिता रातदिवस शेकडो मजूर कार्यरत होते. याशिवाय स्टॉल्सही काढण्यात आले होते. परंतु, सुरुवातीपासूनच या महोत्सवाकडे स्टॉलधारकांनीही पाठ फिरविल्याने येथील निम्म्यापेक्षा अधिक स्टॉल रिकामेच होते. त्यामुळे रिकामे स्टॉल आणि खाली खुर्च्या असेच चित्र अखेरपर्यंत होते.या महोत्सवाची माहिती जाणून घेण्यासाठी तसेच किती शेतकऱ्यांनी भेटी दिल्या, याची आकडेवारी घेण्याकरिता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. विद्या मानकर यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही.स्टॉलधारकांना बसला फटकाया महोत्सवामध्ये शासकीय योजनांची विविध माहिती देणारे स्टॉल, धान्य महोत्सव व शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या इतर वस्तूंचेही स्टॉल लावले होते. या महोत्सवाकरिता मोठ्या प्रमाणात उपस्थिती राहून आपल्या वस्तू व धान्य विकले जाईल, अशी स्टॉलधारकांना अपेक्षा होती. परंतु, महोत्सवाची माहितीच नागरिकांपर्यंत पोहोचली नसल्याने शेतकरी इकडे फिरकलेच नाहीत. परिणामी, स्टॉलधारकांचेही नुकसान होताना दिसू लागल्याने त्यांनी अल्पावधीतच दुकानदारी बंद केली. यात त्यांना मोठा फटका बसल्याचेही काहींनी ‘लोकमत‘शी बोलताना सांगितले.
उपस्थितीचा दुष्काळ, कृषी महोत्सव फ्लॉप!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 9:41 PM
कृषी विभाग आणि आत्माच्यावतीने येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर पाच दिवसीय कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचा प्रचार व प्रसार करण्याकरिता संबंधित विभाग कमी पडल्यामुळे शेतकऱ्यांनी याकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे.
ठळक मुद्देप्रचार-प्रसाराचा अभाव : शेतकऱ्यांनी फिरविली पाठ, लाखो रुपयांचा खर्च व्यर्थ