मोई येथे पाणी पेटले : पाण्याकरिता पाच किलोमीटरची पायपीटअमोल सोटे ल्ल आष्टी (शहीद)तालुक्यातील मोई गावात पाणी टंचाईने भीषण रूप धारण केले आहे. गावातील नागरिकांना पाण्याची गरज भागविण्याकरिता १०० रुपयांत ड्रमभर पाणी घेण्याची वेळ आली आहे. पाणी नसल्यास कधी या ड्रमची किंमत २०० रुपयांवर पोहोचत आहे. याची माहिती जिल्हा प्रशासनाला असूनही त्यांच्याकडून याकडे दुर्लक्ष होत आहे. १ हजार २०० लोकसंख्या असलेल्या या गावात नागरिकांना पाण्याकरिता पाच किमी पायपीट करावी लागत असल्याचे विदारक वास्तव आहे.उन्हाळा सुरू होऊन दोन महिने पूर्ण झाले. दिवसेंदिवस पारा चढत आहे. वाढत्या तापमानामुळे जमिनीतील पाण्याची पातळी खोल जात आहे. मोई या गावात तीव्र पाणीटंचाई आहे. गावातील विहिरी कोरड्या पडल्या. त्यांचा तळ दिसू लागला आहे. हातपंपाला पाणी नाही. डोंगरमाथ्यावर वसलेल्या व बंजारा समाजाचे मोठ्या संख्येने वास्तव्य असलेल्या गावात पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती सुरू आहे. याकडे कोणी लक्ष देईल काय, असा संतप्त प्रश्न गावकऱ्यांनी प्रशासनाला केला आहे. येथील सरपंच अंकुश चव्हाण, ग्रामसेवक अश्विन वानखेडे यांनी पंचायत समिती व तहसीलदार यांना वारंवार माहिती दिली; मात्र प्रशासन टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन देवून बोळवण करीत आहे. रेड झोनमध्ये असलेल्या या गावात चारही बाजूने डोंगर आहे. उंच टेकड्या आहे. गरम वाऱ्याचा मारा गावापर्यंत येवून पोहचला आहे. गावात बंडीवर ड्रम बांधून दुरवरून पाणी आणावे लागत आहे. जनावरांसाठी चारा नाही. त्यामुळे सकाळपासून चारा आणि पाणी या दोन्हींसाठी गावकऱ्यांना पायपीट करावी लागत आहे. उन्हाळ्यात तीन महिने टँकर लावण्याची जबाबदारी शासनाची होती; मात्र तहसीलदार व पंचायत समितीचे याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसत आहे.गावातील बंडीवरून आणलेले पाणी प्रती ड्रम १०० रुपये विकल्या जात आहे. इतके महागडे पाणी गावकऱ्यांना परवडणारे नाही. त्यामुळे गावकरी अडचणीत सापडले आहे. येथे राष्ट्रीय पेयजल योजना जलस्वराज्य प्रकल्प अंतर्गत गावात पाणी आणण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला; परंतु गावात पाणी आले नाही. शासनाने तात्काळ टँकर लावून पाणी समस्या मार्गी लावावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.जिल्ह्यात जाणवणार असलेल्या पाणी टंचाईवर मात करण्याकरिता आराखडा तयार करण्यात आला आहे. यात खासगी विहिरींचे अधिग्रहण व टँकर पुरविण्याचाही यात समावेश करण्यात आला आहे. या गावात टँकर सुरू करण्याबाबत जिल्हा प्रशासनाला मागणी करण्यात आली आहे. असे असताना केवळ वरिष्ठांना कल्पना देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्याकडून टँकर सुरू करण्याची परवानगी नसल्याचे सांगण्यात आले आहे. याचा त्रास मात्र गावाकऱ्यांना सहन करावा लागत आहे. मोई गावातील पाणीटंचाईबाबत जिल्हा स्तरावर माहिती पाठविण्यात आली आहे. मंजुरी आल्यावर टँकर सुरू करू. सदर बाब प्रशासनाच्या विचाराधीन आहे.- आर.एस. हिरणवार, अतिरिक्त तहसीलदार, आष्टी (शहीद)
१०० रुपयांत ड्रमभर पाणी
By admin | Published: April 04, 2015 2:07 AM