चिकणी/जामनी (वर्धी) : जिल्ह्यात दारूबंदी असताना गावोगावी दारूचे पाट वाहत असल्याचे दिसते. याकडे मात्र पोलिसांनी कायमचे जणू डोळेच मिटल्याचे चित्र आहे. चिकणी हे गाव दारू विक्रेत्यांचे माहेरघर बनत चालले असताना आतातर चक्क मद्यपी मुख्य मार्गावर दारूच्या बाटल्या फोडत असल्याचे दिसते.
सुमारे हजार लोकसंख्येच्या गावात बऱ्याच ठिकाणाहून दारूची विक्री होत आहे; मात्र तरीही पोलिसांची चुप्पी संशयास्पद आहे. या मद्यपींमुळे मात्र नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गावात अगदी सहजरित्या दारू मिळत असल्याने अल्पवयीन मुलेदेखील दारूच्या आहारी जात असल्याचे चित्र आहे. गावात कलह, वादाचे प्रकार वाढले आहेत.
बुधवारी रात्रीच्या सुमारास बसस्थानक परिसरात देवळी-पुलगाव मुख्य मार्गावर मद्यपीने १० ते १२ दारूच्या बाटल्या फोडल्या यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. रस्त्यावर पडलेल्या काचांमुळे वाहने पंक्चर होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे गावातील दारू विक्री कायमची बंद करा, अशी मागणी आता नागरिकांतून केली जात आहे.
चिकणी गाव दारूसाठी प्रसिद्ध आहे, परिसरातील खेडेगावचे मद्यपी इथे येऊन मद्यपान करतात. शेती कामासाठी रोजगार मिळणे कठीण झाले आहे, दारू पिण्यासाठी कामावर येण्यापूर्वी ते पैसे मागतात. यामुळे शेतीची कामे वेळेवर होणे अवघड आहे, यासाठी दारू बंद होणे गरजेचे आहे.
अतुल देशमुख, नागरिक चिकणी.