वर्धा : मद्यधुंद अवस्थेत असलेल्या मद्यपीने शहरातील बॅचलर रोडवर चांगलाच धिंगाणा घातला. शिववैभव सभागृहालगतच एका कॉम्प्लेक्ससमोर रस्त्याकडेला उभ्या कारची काच फोडून थेट ड्रायव्हिंग सीटवर जाऊन तो माथेफिरु बसला. ही बाब सजग नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी रामनगर पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मद्यपी माथेफिरुला ताब्यात घेतले.
शिववैभव सभागृहाच्या काही अंतरावर असलेल्या कॉम्प्लेक्ससमोर रस्त्याकडेला एमएच ३२ एएच ६१५३ क्रमांकाची पांढऱ्या रंगाची कार उभी होती. दरम्यान, मद्यधुंद एक माथेफिरु रस्त्यावर धिंगाणा घालत होता. तो माथेफिरु त्या कारजवळ गेला आणि कारची पाहणी करु लागला. पाहणीदरम्यान त्याने कारला लाथा मारल्या तसेच पहिले हाताने काच फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, काच फुटत नसल्याचे पाहून माथेफिरुने चक्क दगडाने ड्रायव्हिंग सीटकडील काच फोडण्यास सुरुवात केली.
काच फाेडून तो थेट कारमध्ये जाऊन बसला. ही बाब रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी त्याला पकडून कारबाहेर काढले आणि याची माहिती रामनगर पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी येत पंचनामा करुन मद्यपी माथेफिरुला पोलीस वाहनात बसवून घेऊन गेले. मात्र, या घटनेने दोन्ही बाजूची वाहतूक सुमारे अर्धा ते एक तास खोळंबली होती.
मद्यपी माथेफिरु जालना येथील रहिवासी
रामनगर पोलीस घटनास्थळी पोहचले असता माथेफिरु हा रस्त्याकडेला झोपलेला होता. त्याच्या सभोवताल नागरिक जमा झाले होते. पोलिसांनी माथेफिरुची झिंग उतरवून त्याला रुग्णालयात नेले असता त्याचे नाव अरुण रमेश शेलार (रा. जालना) असल्याचे समजले. तसेच तो मानसिक आजाराने ग्रस्त असल्याचेही समजले.
संतप्त नागरिकांनी दिला चोप
मद्यपीने कारची काच फोडल्यावर नागरिकांनी चांगलीच गर्दी केली होती. काही नागरिकांनी माथेफिरुला पकडून ठेवले तर काहींनी त्याला चांगलाच चोप देत त्याची झिंग उतरविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, त्याने नागरिकांनाच शिवीगाळ केल्याने नागरिकांनी त्याला चांगलेच बदडले.
सर्व घटनाक्रम मोबाईलमध्ये केला चित्रित
बॅचलर रोडवर मद्यपीचा सुरु असलेला धिंगाणा रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांनी आपल्या माेबाईलमध्ये चित्रित केला. काही वेळातच या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. रात्री उशिरापर्यंत अनेकांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर याच व्हिडिओची चर्चा सुरु होती.