जीवनदायी अंतर्गत मोफत उपचार : अतिरिक्त सर्किट नष्ट करण्यात डॉक्टरांना यशवर्धा : दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्था संचालित सावंगी (मेघे) येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात आणखी एक नवी उपचारपद्धती अंमलात आली आहे. या पद्धतीमुळे हृदय रुग्णाला दिलासा देण्यात यश प्राप्त झाले आहे. हृदयरोग विभागातील तज्ज्ञांनी इलेक्ट्रोफिजिओलॉजी स्टडी करून रेडिओ फ्रिक्वेन्सी अॅबलेशन प्रक्रियेद्वारे हृदयाला दुहेरी सर्कीट असणाऱ्या रुग्णावर उपचार केले.चंद्रपूर जिल्ह्यातील, मुल तालुक्यातील शिनतळा येथील लता मारोती चलाख (३४) या महिलेला बऱ्याच दिवसांपासून जलदगतीने हृदयात धडधड होण्याचा व छातीत दाटून येण्याचा त्रास होता. हा त्रास वाढत गेल्याने तिला चंद्रपूर येथील खासगी रुग्णालयात उपचारांसाठी नेण्यात आले. पर्याप्त उपचार उपलब्ध नसल्याने अखेर सावंगी (मेघे) रुग्णालयात तिला दाखल करण्यात आले. सावंगीच्या आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयातील हृदयरोग विभागातील डॉ. गजेंद्र मनक्षे यांनी वैद्यकीय तपासणी केली असता रुग्णाच्या हृदयाला दुहेरी सर्कीट असल्याचे ईसीजी व अन्य चाचण्यात दिसून आले. हृदयाला अतिरिक्त सर्कीट असणाऱ्या रुग्णाचा ईसीजी सामान्य रुग्णासारखा नसतो. सामान्यत: हृदयस्पंदनांची गती मिनिटाला १०० असते. मात्र दुहेरी सर्कीट असणाऱ्या रुग्णांच्या हृदयाची स्पंदनगती १८० ते १९० पर्यंत जाते. त्यामुळे, हृदयाची अत्याधिक धडधड होण्यापासून तर रुग्ण मूर्च्छित होण्यापर्यंत अनेक धोके संभवतात. डॉ. गजेंद्र मनक्षे, डॉ. अभिजित शेळके, डॉ. सतीश खडसे यांनी रुग्णाच्या आजाराचे पूर्ण निदान करून रुग्णालयातील कॅथ लॅब आणि हृदयरोग विभागातील तंत्रज्ञ प्रणय गवई, वैभव लुटे, कमलेश पलेरिया या सहकाऱ्यांच्या सहाय्याने रेडिओ फ्रिक्वेन्सीद्वारे अतिरिक्त सर्कीट नष्ट करण्याची प्रक्रिया यशस्वीरित्या अंमलात आणली. विशेष म्हणजे, राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत रुग्णावर उपचार करण्यात आल्याने रुग्णाच्या परिवाराला ही सेवा मोफत उपलब्ध झाली.विदर्भात हृदयाला दुहेरी सर्कीट असणाऱ्या रूग्णांची संख्या बरीच असून त्यांना विनामुल्य अथवा अत्यल्प खर्चात रेडिओ फ्रिक्वेन्सीद्वारे उपचार प्राप्त करण्याची संधी उपलब्ध झाली असल्याचे डॉ. मनक्षे यांनी यावेळी सांगितले.(शहर प्रतिनिधी)
रेडिओ फ्रिक्वेन्सी अॅबिलेशनद्वारे दुहेरी सर्किट रुग्णावर हृदयोपचार
By admin | Published: July 02, 2016 2:22 AM