५५ पैकी १५ एकर शेती वाहितीखाली : पॉलिशेडची लागली वाट लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : तालुक्यात एकमेव असलेल्या कृषिचिकित्सालय व शेतकरी प्रशिक्षण केंद्राला अखेरची घरघर लागली आहे. शासनाने कर्मचारी भरती पूर्णत: बंद केल्याने येथे अवघ्या दोन कर्मचाऱ्यांवर ५५ एकराचा डोलारा आहे. कर्मचारी नसल्याने तब्बल ४० एकर शेती पडिक असून केवळ १५ एकर शेती वाहितीखाली आहे. यामुळे येथे लागत जास्त आणि उत्पादन शुन्य अशी स्थिती आहे. सदर चिकित्सालय शेतकऱ्यांकरिता कुचकामी ठरत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. याप्रकरणी जिल्हा कृषी अधिक्षकांनी लक्ष देत सुधारणा करण्याची मागणी आहे.आष्टी-तळेगाव राष्ट्रीय मार्गावर प्रशस्त जागेत असलेल्या या कृषिचिकित्सालयात बांधकाम करण्यात आलेले शेडचे टिनपत्रे पूर्ण उडाली आहे. पॉलीशेडवर लाखोंचा खर्च करण्यात आला. यामध्ये संत्राच्या कलमा तयार करण्यासाठीचे खुंट बांधण्यात आले नाही. यामुळे शेतकऱ्यांना कलमा मिळणार नाही असे सांगण्यात येत आहे. शेतीपयोगी साहित्य बऱ्याच वर्षांपासून पडून असल्याने गंजले आहे. जमिनीवर पीक पेरणीचा खर्च कागदोपत्री दाखवून उधळपट्टी सुरू आहे. या चिकित्सालयाला शासनाकडून १० लाख रुपयांचे वार्षिक अनुदान प्राप्त होते. सन २०१४-१५, २०१५-१६, २०१६-१७ या तीन वर्षात तब्बल ३० लक्ष रुपये खर्च करण्यात आले आहे. असे असताना येथे असुविधांचा कळस आहे. शेतीची देखभाल करण्यावर झालेला खर्च पाहुन शेतकऱ्यांनी कलमा का तयार झाल्या नाही, असा प्रश्न अधिकाऱ्यांना विचारला असता त्यांनी कर्मचारी नाही एवढे उत्तर दिल्याचे शेतकरी सांगतात. वृक्षलागवडीसाठी रोपटे तयार करावयाचे काम अद्यापही सुरू झाले नाही. या चिकित्सालयात पॉलीथीनमध्ये माती भरली असून त्या सर्व पॉलिथीनचा एक ढीग लावून ठेवला आहे. माती, रोपमाल मदतनीस, कृषीसहायक हे पदही अद्याप भरले नाही. त्यामुळे हे चिकित्सालय उद्धवस्त होण्याच्या मार्गावर आहे. शासनाने दखल घेवून उपाययोजनेची मागणी आहे. कर्मचारी नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. शासनाचे अनुदान मिळाले, मात्र शेती करायलाही मनुष्यबळ नाही.- अरुण बलसाणे, उपविभागीय कृषी अधिकारी, आर्वी.
कर्मचाऱ्यांअभावी कृषी चिकित्सालय मोडकळीस
By admin | Published: June 13, 2017 1:04 AM