डागडुजीचा खर्च ठरला निरर्थक : नदी कोलारली, कडा खरबडून गेल्या आकोली : पर्यटन क्षेत्राचा क दर्जा प्राप्त ढगा भुवनातील बंधारा कामाच्या निकृष्ट दर्जामुळे वाहून गेला होता. यामुळे नदीच्या कडा कोलारून नदीचे प्रात्र मोठे झाले होते. यावर उपाययोजना करीत नदीपात्र खरबडून जाऊ नये म्हणून मोठा खर्च करण्यात आला; पण तोही निरर्थक ठरला आहे. या बंधाऱ्यात आजही पाणी थांबतच नसल्याचे दिसते. शनिवारी रात्री ढगा भूवन परिसरात मुसळधार पाऊस झाला. यामुळे पायथ्याशी वाहणाऱ्या धाम नदीला पूर येऊन नदी कोलारली. मागील वर्षी बंधाऱ्यातील पाणी वाहून जाऊ नये, नदीच्या काठची माती पावसासोबत वाहून जाऊ नये म्हणून भिंतीलगत पायवा खोदून दगड व सिमेंटचे काम करण्यात आले. शिवाय दगड वाहून जाऊ नये म्हणून खालून वरपर्यंत दगडांना लोखंडी जाळीचे वेष्टन देण्यात आले; पण दगडात सिमेंटचा वापर न केल्याने पाणी दगडातून बाहेर पडू लागले. परिणामी, नदीच्या कडा वाहून गेल्यात. भाविकांना स्नान करणे व जंगलातील वन्यप्राण्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे हा बंधाऱ्याचा हेतू होता; पण बंधारा दोन्ही बाजूंनी फुटल्याने बंधाऱ्यात पाणी साचत नाही. बंधाऱ्याची डागडुजी करणे महत्त्वाचे होते; पण जखम एकीकडे व मलमपट्टी भलतीकडे, असा प्रकार येथे घडला. या कामावर लाखो रुपये खर्ची घालण्यात आाले; पण बंधाऱ्यात पाणी साठवण होत नाही. नदीच्या कडांचे संरक्षण होत नसल्याने निधीही पाण्यासोबत वाहून गेला. वनविभागाने सदर बंधारा दुरूस्तीकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.
ढगा भूवनातील बंधारे फुटल्यामुळे पाणी जाते वाहून
By admin | Published: July 25, 2016 2:09 AM