वर्धा : तेलंगणा एक्सप्रेसच्या एस आठ क्रमांकाच्या डब्ब्याचे चाक जाम झाल्याने अचानक आग लागली. रेल्वे धावत असताना समोरून येणाऱ्या रेल्वेचालकाच्या ही बाब लक्षात येताच ही रेल्वेगाडी सेवाग्राम येथे थांबविण्यात आली. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला.
नागपूर येथून निघालेली १२७२४ तेलंगणा ऐक्सप्रेस सेलू नजीक असताना रेल्वेगाडीतील एस आठ डब्ब्याचे चाक अचानक जाम झाले आणि आग निघू लागली. या दरम्यान समोरून येणाऱ्या एका रेल्वेगाडी चालकाच्या ही बाब लक्षात येताच तत्काळ सेलू मार्गावरील स्टेशनवर ही रेल्वे थांबविण्यात आली. रेल्वे कर्मचाऱ्यांनी पाहणी करीत ब्रेक दुरुस्ती केल्यानंतर रेल्वे सेवाग्राम रेल्वे स्थानकापर्यंत आणली. पुढील धोका टाळण्यासाठी तांत्रिक विभागाच्या दोन कर्मचाऱ्यांना रेल्वेत पाचारण करण्यात आले. तेलंगणा ऐक्सप्रेस सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास सेवाग्राम येथील रेल्वेस्थानकावर आली असता दुरुस्तीचे साहित्य घेऊन रेल्वे कर्मचाऱ्यांनी पाहणी केली. रेल्वे विभागाचे कनिष्ठ अभियंता सतीश वाघमारे यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांसह ब्रेकची दुरुस्ती केली. तब्बल २० मिनीटे तेलंगणा ऐक्सप्रेसच्या बोगीतील ब्रेक दुरुस्तीचे काम चालल्यानंतर रेल्वे पुढील प्रवासासाठी निघाली.