पंक्चर होण्याची भीती : प्लास्टिकच्या गतिरोधकातील खिळे पडले उघडे वर्धा : शहरात आधीच अनधिकृत गतिरोधकांचे प्रमाण वाढले आहे. त्यातच अधिकृत असलेले गतिरोधकही मनस्ताप देणारे ठरत आहे. इंदिरा गांधी चौकातून शिवाजी पुतळ्याकडे जात असलेल्या रस्त्यावर केसरीमल विद्यालयासमोरील प्लास्टिकच्या गतिरोधकातील खिळे उघडे पडले आहे. त्यामुळे वाहने पंक्चर होऊन अपघाताची शक्यता बळावली आहे. वर्धा नागपूर मार्गावर इंदिरा गांधी चौकात केसरीमल कन्या शाळा आणि भरत ज्ञान मांदिरम ही दोन विद्यालये आहेत. या मार्गावर नियमित वर्दळ असल्याने शाळा भरताना व सुटताना येथे गर्दी होते. ही बाब लक्षात घेत येथे गतिरोधकाची मागणी करण्यात आली होती. मागणीची दखल घेत वाहतूक प्रशासनाद्वारे येथे दोन ठिकाणी प्लास्टिकचे तीन तीन गतिरोधक बसविण्यात आले. सदर गतिरोधक प्लास्टिकचे असल्याने ते बसविल्यापासूनच नागरिक संताप व्यक्त करीत होते. या गतिरोधकांमुळे पाठीचे आजार वाढत असल्याची ओरड होत होती. त्यामुळे काहीच महिन्यांपूर्वी या गतिरोधकांच्या मध्ये डांबराचा थर टाकून गतिरोधकांची उंची कमी करण्यात आली. पण सदर गतिरोधक रात्री होत असलेल्या जड वाहतुकीमुळे ठिकठिकाणी तुटून गतिरोधकासाठी ठोकलेले खिळे उघडे पडले आहे. या खिळ्यामुळे वाहने पंक्चर होण्याची शक्यता बळावली असून त्यामुळे अपघाताचाही धोका वाढला आहे. सदर गतिरोधक पूर्णपणे हटवून येथे डांबरी गतिरोधक बसविण्याची मागणी आहे.(शहर प्रतिनिधी)गतिरोधक तुटून उघडे पडलेले खिळे धोक्याचे नागरिकांची मागणी आणि शाळकरी विद्यार्थ्यांच्या जीवितास असलेला धोका लक्षात घेता केसरीमल कन्या शाळेसमोर प्लास्टिकचे गतिरोधक बसविण्यात आले. या मार्गावर दिवसा जड वाहनांना बंदी असली तरी रात्रीला या मार्गाने जड वाहने धावतात. अशा जड वाहनांमुळे प्लास्टिकचे गतिरोधक ठिकठिकाणी तुटून त्यासाठी वापरण्यात आलेले खिळे उघडे पडले आहे. या उघड्या पडलेल्या खिळ्यांमुळे वाहने पंक्चर होण्याची शक्यता बळावली आहे. तसेच वाहनचालकांना गतिरोधकाहून जाताना वाहनांची गती खूपच कमी करावी लागत असल्याने वयोवृद्धांची वाहने तर अनेकदा बंदच पडतात. यामुळे अपाघाताचा धोका असतो. गातिरोधकच काढून टाकण्याची मागणीसदर परिसरात गतिरोधकाची मागणी करण्यात आली असली तरी ते गतिरोधक डांबराचे असावे, अशी नागरिकांची अपेक्षा होती. पण झटपट गतिरोधक लावण्याच्या नादात वाहतूक विभागाद्वारे कडक प्लास्टिकचे गतिरोधक लावण्यात आले. यामुळे होत असलेला धोका लक्षात घेत काहीच दिवसांपूर्वी गतिरोधकांमध्ये डांबराचा मुलामाही टाकण्यात आला. पण सदर गतिरोधकच धोक्याचे ठरत असल्याने ते काढून येथे डांबराचे कमी उंचीचे पक्के गतिरोधक तयार करावे, अशी मागणीही वाहनचालकांतून करण्यात येत आहे.
तुटक्या गतिरोधकांमुळे वाहनांत बिघाड
By admin | Published: September 15, 2016 1:03 AM