लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर/मांडगाव : शेडगाव चौरस्ता ते सेवाग्राम मार्गावर अपघाताचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. या रस्त्यावरील लहान-मोठ्या नाल्यांवर जुने ढोल्यांचे पूल काढून नवीन पुलांचे बांधकाम केले जात आहे. हे काम करीत असताना दिवसा करून ठेवलेले खड्डे व्यवस्थित बुजविले जात नाहीत. परिणामी, रात्रीच्या काळोखात वाहन धारकांना अपघातांना सामोरे जावे लागत आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.सेवाग्राम ते शेडगाव चौरस्ता या मार्गाच्या रूंदीकरणाचे तथा लहान-मोठ्या नाल्यांवरील जुने ठेंगणे पूल काढून नवीन उंच पुलांची निर्मिती केली जात आहे. हे करीत असताना दिवसा खड्डे केले जातात; पण ते बुजविले जात नाहीत. रात्रीच्या काळोखात हे खड्डे दिसत नसल्याने अपघात होत आहेत. शिवाय काही नागरिक दुचाकीने ये-जा करतात. ते सकाळी या मार्गाने जातात तर त्यांना रस्ता व्यवस्थित दिसतो; पण रात्री परत येत असताना चांगल्या रस्त्यावर खड्डे आढळतात. परिणामी, त्यांना अपघातांना सामोरे जावे लागते. या प्रकारामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. सेवाग्राम ते मांडगावपर्यंतच्या ग्रामीण भागातील नागरिक या मार्गाने बहुदा दुचाकीनेच प्रवास करतात. यामुळे त्यांनाच अधिक त्रास सोसावा लागतो. याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.दिशादर्शक, पांढरे पट्टे नसल्याने अपघातमांडगाव ते सेवाग्राम मार्गावर सुरू असलेल्या कामांबाबत कुठेही फलक लावण्यात आलेले नाहीत. यामुळे कुठे काम सुरू आहे, कुठून वळण रस्ता केला आहे वा कुठे रस्ता खराब आहे, हे कळायला मार्ग नाही. परिणामी, दुचाकी चालकांना हमखास अपघातांना सामोरे जावे लागते. नव्याने तयार करण्यात आलेले पूल वा रस्त्यावर कुठेही पांढरे पट्टे मारण्यात आलेले नाहीत. यामुळे रस्त्याचा अंदाज येत नाही. बांधकाम विभागाने याकडे लक्ष देत कार्यवाही करणे अगत्याचे झाले आहे.रस्त्यावर टाकली जाते रेती, गिट्टीसेवाग्राम ते शेडगाव चौरस्त्यापर्यंत रस्ता रूंदीकरण तथा नवीन पुलांचे बांधकाम केले जात आहे. हे काम करीत असताना त्यासाठी लागणारे साहित्य रेती, गिट्टी, मुरूम रस्त्यावरच आणून टाकले जात आहे. परिणामी, या साहित्यामुळे रहदारीला मोठा अडथळा निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. काही नागरिकांचे रेती, गिट्टीवरून घसरून अपघात झाले आहेत. त्यांना अकारण औषधोपचाराचा भुर्दंड सोसावा लागला आहे. या प्रकारामुळे कंत्राटदाराप्रती रोष व्यक्त केला जात आहे. बांधकाम विभागाने लक्ष देत कंत्राटदारास समज देणे गरजेचे आहे.
पुलाच्या कामामुळे अपघातात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 11:26 PM
शेडगाव चौरस्ता ते सेवाग्राम मार्गावर अपघाताचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. या रस्त्यावरील लहान-मोठ्या नाल्यांवर जुने ढोल्यांचे पूल काढून नवीन पुलांचे बांधकाम केले जात आहे.
ठळक मुद्देसेवाग्राम-शेडगाव रस्ता : कामांचे फलक नसल्याने अडचण