रस्ते झाले अरुंद : प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेण्याची गरज वर्धा : शहरासह शहरानजीकच्या ग्रामीण भागात नागरिकांकरवी ठिकठिकाणी नवीन इमारती तयार करण्याचे काम सुरू आहे. परंतु, बांधकामासाठी लागणारे साहित्य रस्त्याच्या कडेला टाकण्यात येत असल्याने पूर्वीच अरुंद असलेले रस्ते अधिक अरुंद झाले आहेत. सदर प्रकारामुळे वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून याकडे जातीने लक्ष देत कार्यवाही करण्याची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांनी विशेष मोहीम हाती घेण्याची गरज आहे. शहरातील रामनगर, कृष्णनगर, तुकाराम वॉर्ड, गौरक्षण वॉर्ड, हिंदनगर, मानसमंदिर परिसर आदी भागासह शहरानजीकच्या बोरगाव (मेघे), सिंदी (मेघे), नालवाडी, आलोडी आदी भागात ठिकठिकाणी व्यावसायिक प्रतिष्ठाने तसेच घरांचे बांधकाम सुरू आहे. नवीन इमारतीच्या बांधकामासाठी गिट्टी, रेती, मुरूम, विटा आदी साहित्याची आवश्यकता असते. सदर साहित्य ज्या परिसरात नवीन इमारतीचे बांधकाम सुरू आहे तेथील रस्त्यांच्या कडेला टाकल्या जात असल्याचे बघावयास मिळत आहे. नवीन इमारतीच्या बांधकामासाठी लागणारे साहित्य व बांधकामाचे वेस्टेज मटेरियल वाहनचालकांची व इतर नागरिकांची पर्वा न करता रस्त्याच्या कडेलाच टाकल्या जात आहे. शहरातील बहुतांश भागातील रस्त्यावर नवीन बांधकामासाठी वापरणारी गिट्टी, रेती टाकण्यात आल्याने वाहनचालकांना तारेवरची कसरत करतच या रस्त्यांवरून पुढील प्रवास करावा लागत आहे. एकूणच रस्त्यावरील बांधकाम साहित्यामुळे वाहनचालकांसह नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे. याकडे लक्ष देत योग्य कार्यवाही करण्याची गरज आहे.(शहर प्रतिनिधी)
बांधकाम साहित्यामुळे वाहनचालकांना डोकेदुखी
By admin | Published: April 05, 2017 12:43 AM