लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकऱ्यांचा कापूस व्यापाऱ्यांच्या घशात गेल्यानंतर हंगाम संपत आल्यावर कापसाचे दर वाढत आहेत. सध्या बाजारात कापसाचे दर ६ हजार ५०० रुपयांपर्यंत गेलेले आहे. ही भाववाढ केंद्र सरकारने हमीभाव वाढविल्याने झाली नाही, तर रुपयाचे सतत झालेले अवमूल्यन आणि सरकीच्या दरातील तेजीमुळे झालेली आहे, असे शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.मोदी सरकारने २०१८-१९ च्या हंगामासाठी कापसाचे हमीभाव ५ हजार ४५० रुपये प्रतिक्विंटलची घोषणा केली. मागीलवर्षीच्या २०१७-१८ च्या हंगामात कापसाचा हमीभाव ४ हजार ३६० रुपये होता. म्हणजेच प्रतिक्विंटल १ हजार ९० रुपये वाढ झालेली आहे. ही वाढ केवळ २४ टक्केच आहे. डॉ. मनमोहनसिंग सरकारने २००८-०९ हमीभाव २ हजार ३० रुपयांवरून ३ हजार रुपये प्रतिक्विंटल केला होता. ही वाढ ५० टक्के होती. हा दर त्या काळात देशातील व जागतिक बाजारपेठेतही मिळत नव्हता. सर्व कापूस केंद्रीय महामंडळ (सीसीआय) व नाफेडने खरेदी केला होता. आज मोदी सरकारला ५ हजार ४५० रुपये दराने कापूस खरेदी करावा लागत नाही. कारण बाजारात ६ हजार ते ६ हजार ५०० रुपये दर आहेत. यावर्षी कापूस हंमाग सुरू झाला, तेव्हा कापसाचे दर ५ हजार ५०० रुपये ते ५ हजार ८०० रुपयांदरम्यान होते. मध्यंतरी ५ हजार २०० ते ५ हजार ४०० रुपये झाले होते. आज ते पुन्हा ६ हजार ते ६ हजार ५०० रुपयांपर्यंत वाढले आहे. या तेजीचे मुख्य कारण रुपयाचे अवमूल्यन व सरकीच्या दरातील तेजी आहे. जागतिक बाजारात रुईच्या दरात तेजी नाही. मागच्या हंगामात ८० ते ९० सेंट प्रतिपाऊंड रुईचे भाव होते. आजही ८७ सेंट प्रतिपाऊंड रुईचा दर आहे. आज ७० रुपये प्रतिडॉलर हा विनिमय दर आहे. गतवर्षी ६२ रुपये प्रतिडॉलर विनिमय दर होता. अमेरिकेचा कापूस शेतकरी कमी दरात विकतो तरीही आत्महत्या करत नाही, कारण त्यांना ४.६ बिलियन डॉलर म्हणजेच जवळपास ३२ हजार कोटी रुपयांचे अनुदान मिळते. पण, आपल्याकडे तशी योजना नसल्याने आणि हंगाम संपल्यावर कापसाचे दर वाढत असल्याने शेतकऱ्यांचेच कंबरडे मोडत आहे. आताही ही भाव वाढ शेतकऱ्यांच्या नाही तर व्यापाऱ्यांच्या हिताची ठरली आहे.निर्यात घटली आणि आयात वाढलीमध्यंतरी अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार युद्ध वाढले आणि भारतातून निर्यात वाढून दर वाढतील अशी चर्चा होती. परंतु, यंदा कापसाची निर्यात वाढली नसून कमी झाली तर आयात वाढली आहे. मागील वर्षी २० लाख गाठींची आयात झाली होती. यंदा त्यात वाढ होऊन २७ लाख गाठींची आयात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कापसाच्या दरावर याचा परिणाम होऊन पुढील हंगामातील हमीभावावरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सरकीच्या भावात विक्रमी वाढीचे कारणसरकीचे भाव वाढल्यानेच आपल्याकडील कापसाला झळाळी आली आहे. पण, सरकीचे भाव अचानक वाढण्यामागे अमेरिकेतील मका पीक हे मुख्य कारण आहे. अमेरिकेतील मका पीक केसाळ अळीने नष्ट केले आहे. म्हणून सरकीच्या ढेपीच्या भावात वाढ झाली आहे. परिणामी, आपल्याकडील मक्याचे १ हजार २०० रुपये प्रतिक्विंटल असलेले भाव २ हजार रुपयांवर पोहोचले. तसेच ढेपीची मागणी वाढल्याने सरकीचे दरही वाढले आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी रुपयाच्या अवमूल्यनाची निंदा करायचे; परंतु आज रुपयाच्या अवमूल्यनामुळे कापसाचे दर वाढून शेतकºयांना काहीसा लाभ मिळाला. हे अवमूल्यनच शेतकऱ्यांना तारक ठरले आहे. अवमूल्यनामुळे कापसाची आयात मर्यादित झाली. विशेषत: सरकार कापसावर आयात कर का लावत नाही? हाच मोठा प्रश्न आहे. कापसाची जर आयात कायम असती तर पुढील हंगामातही कापसाचे भाव कमी राहिले असते.- विजय जावंधिया,शेतकरी नेते