कारंजा तालुक्यातील आठ गावांत सर्वेक्षण : जिल्हा मासिक चर्चासत्रात पीक संरक्षणाबाबत सल्लावर्धा : कृषी अधिकारी प्रतिनिधी, तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी आणि कृषी विज्ञान केंद्र सेलसुरा येथे शास्त्रज्ञांकडून कारंजा तालुक्यातील आठ गावांत सर्वेक्षण करण्यात आले. यात संत्रा, लिंबूवर्गिय तसेच कांदा, मिरची, काकडी आदी पिकांवर विविध रोगांचे सावट असल्याचे निदर्शनास आले. या रोगांचे नियोजन शेतकऱ्यांना करता यावे म्हणून मासिक चर्चासत्रात विविध उपाययोजना सूचविण्यात आल्या.कारंजा तालुक्यातील धावडी (बु), नारा, सावली (बु), जसापूर, तरोडा रिठ, जऊरवाडा, भालू व धावसा (बु) या गावांत सर्वेक्षण करण्यात आले. यात संत्रा, लिंबूवर्गीय पिकांवर सायला (सिट्रस सिला), डिंक्या रोग आढळून आला. लिंबूवर्गीय, कांदा, मिरचीवर फुलकिडे, जरबेरा फुलशेती, केळीवर करपा, काकडीवर्गीय पिकावर फळमाशीचा प्रादुर्भाव आढळून आला. यामुळे संत्रावरील सायला किडीचे व्यवस्थापन करणे अत्यंत गरजेचे आहे. संत्रा पिकावरील ही प्रमुख किड असून किडीचा आकार लहान आहे. तिच्या करड्या रंगाच्या पंखाने ती ओळखली जाते. तिचे आयुष्यमान सहा महिन्यांचे असून सायला किड मुख्यत: नवीन पालवी, फुले, कोवळे शेंडे व फळातील रस शोषून घेऊन नुकसान करते. रसशोषणामुळे पाने करपली जातात. व कळया न उमलताच गळून पडतात. ही कीड नवतीवर येत असल्याने यावर्षी जानेवारी ते मार्च महिन्यातच किडीचा प्रादुर्भाव संत्रावर्गीय पिकावर दिसून येत आहे. ही किड मोसंबी, लिंबू, कढीपत्ता या झाडावर अधिक प्रमाणात आढळून येते. ही किड कोवळ्या फांद्यावर ८०० पर्यंत अंडी घालते. अंड्यातून पाच ते सहा दिवसांत पिल्ले बाहेर पडतात व पूर्ण वाढ होण्यास दोन ते तीन आठवड्याचा कालावधी लागतो. पूर्ण वाढ झालेल्या सायला झाडावर सहा महिन्यापर्यंत जिवंत राहू शहते. या किडीचे व्यवस्थापन एकात्मिक पद्धतीने करावे लागले. मासिक चर्चासत्राला प्रकल्प संचालक जी.आर. कापसे, दीपक पटेल, आर.व्ही. चनशेट्टी, प्रा. नागदेवते, बी.जी. राठोड, जी.के. वाघमारे, जे.जी. ब्राह्मण, पी.डी. गुल्हाणे, भोसले, एस.आर. हाडके, एस.बी. साखरे, आर.पी. धनविजय, एस.यु. निगडे उपस्थित होते. आशिष टावरी, तुळशीराम कालभुत, किनकर, प्रवीण गाखरे, श्रावण बन्नगरे, भोजराज खरपुरीया, मोहनलाल उमेरिया, प्रवीण हिंगवे, पठारे, हेमराज, पंढरीनाथ खवशी आदी शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी करीत उपाय सूचविण्यात आले.(कार्यालय प्रतिनिधी)डिंक्या रोगावर साल काढणे हा उपायडिंक्या रोगाचा प्रादुर्भाव संत्रा पिकावर वर्धा आणि नागपूर जिल्ह्यात दिसून येत आहे. या रोगाच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी रोगग्रस्त झाडांची साल धारदार आणि निर्जंतुक पटाशीने काढून १ टक्का पोटॅशियम परमॅगनेटच्या द्रावणाने निर्जंतुक करून त्यावर ब्रोडोपेस्ट लावावा, असे उपाय पिकसंरक्षण कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप दवने यांनी सूचविले.सायला (सिट्रस सिला) या किडीच्या व्यवस्थापनाकरिता इमिडाक्लोप्रिड १७.८ टक्के दहा मिली वा मिथिल डिमेटॉन २५ टक्के प्रवाही दहा मिली वा निंबोळी तेल १०० मिली यापैकी दहा लिटर पाण्यात एका किटकनाशकाची फवारणी दहा लिटर पाण्यात मिसळून करता येते. निंबोळी तेलात १५ ते २० ग्रॅम डिटर्जेंट पावडर तसेच ३० ग्रॅम कॉपर आॅक्सिक्लोराईड पावडर मिसळून या नवतीवर आलेल्या सायला किडींच्या व्यवस्थापनाकरिता दोन ते तीन फवारण्या देऊन सायला किडीचे व्यवस्थापन करावे, असे उपायही मासिक चर्चासत्रात त्यांनी सूचविले.
फळबागांसह कांदा, मिरची पिकांवर रोगांचे सावट
By admin | Published: March 14, 2016 2:18 AM