वर्धा : वादळ आणि गारपिटीने पिकांची हानी झालेल्या शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवून तलाठ्याने स्वत:च निधी हडप केल्याप्रकरणी खैरवाडा (ता.कारंजा) येथील शेतकऱ्यांनी, तर गारपीटग्रस्त शेतकऱ्यांचा निधी इतरत्र वळविल्याप्रकरणी ब्राह्मणवाडा येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तक्रारवजा निवेदन सादर केले.खैरवाडा शिवारात १५ फेब्रुवारी २०१४ ला वादळ आणि गारपिटीने चना, गहू, कपाशी आदी पिकांचे मोठे नुकसान झाले. चार महिन्यांनी शासनाची मदत आली. मदतीच्या यादीत फक्त १३ शेतकऱ्यांचीच नावे आढळून आली. तलाठी आणि कोतवाल यांनी स्वत:सह आपल्या नातेवाईकांच्या नावे मदत मिळविली, तसेच मर्जीतील लोकांना मदत मिळवून दिल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला. ज्यांच्याकडे तीन ते चार एकर शेती आहे, त्यांना २२ हजार ते २४ हजार रुपयांपर्यंत मदत देण्यात आली. तर ज्यांच्याकडे दोन हेक्टर किंवा त्यापेक्षा अधिक जमीन आहे त्यांना सात हजार, नऊ हजार १२ हजार, १५ हजार रुपयांची मदत मिळाली. अनेक शेतकऱ्यांना पिकांचे नुकसान होऊनही काहीच मोबदला मिळाला नाही, असेही निवेदनात म्हटले आहे. यापूर्वीही तलाठी आणि कोतवाल यांनी अतिवृष्टी निधीत घोळ केला आरोप करण्यात आला.२०१२-१३ मध्ये लाल्याच्या वाटपातसुद्धा चार-पाच शेतकरी मदतीपासून वंचित राहिले. पुराने नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या जमिनी पूर्णत: खरडून निघाल्या; पण शासकीय मदत मिळाली नाही. अतिवृष्टीमुळे ज्या १३ शेतकऱ्यांची शेती पडिक झाली, त्यांना दोन ते तीन हजार रुपयांची मदत मिळाली आणि ज्यांचे काहीच नुकसान झाले नाही, त्यांनाही तेवढीच मदत मिळाल्याचा प्रकार घडला आहे.रंगराव गोविंद मरस्कोल्हे या शेतकऱ्याला तर एकही रुपयाची मदत मिळाली नाही. सलग तीनदा नुकसान होऊनही त्यांना कधीच मदत देण्यात आली नाही. तलाठ्याने अनेक शेतकऱ्यांची नावे गाळताना स्वत:चे नाव मात्र मदत यादीत समाविष्ट केले. मौजा खैरवाडा क्षेत्रात स्वत:च्या नावावर शेती दाखवून बँक खात्यात सहा हजार २५० रुपये जमा करुन घेतले. या सर्व प्रकरणाची चौकशी करुन कोतवाल आणि तलाठी यांच्यावर कठोर कारवाई करावी तसेच वाढोणा आणि खरांगणा(मोरांगणा) या दोन्ही बँकेच्या शासन मदतीच्या याद्या तपासण्यात याव्या, अतिवृष्टी आणि गारपिटीचा फटका बसलेल्या; पण मदतीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना मोबदला देण्यात यावा, अशी मागणी खैरवाडा येथील शेतकऱ्यांनी केली आहे.निवेदनावर साहेब मरस्कोल्हे, नामदेव मरस्कोल्हे, लक्ष्मण चौकोने, सदाराम खंडाते, अंबादास खंडाते, ओमप्रकाश कोहळे, धनराज चारोडे, लक्ष्मी मरापे, यांच्यासह ४४ शेतकऱ्यांनी स्वाक्षरी केली आहे. त्याचप्रमाणे ब्राह्मणवाडा येथील शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात गारपीटग्रस्त यादीत आपल्याला समाविष्ट करण्याची मागणी केली आहे. फेब्रुवारी २०१४ मध्ये झालेल्या वादळी पाऊस व गारपिटीमुळे शेतातील गहू,चना आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले. शासनाच्या आदेशान्वये आमच्या शेताची पाहणीही करण्यात आली. तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी अधिकाऱ्यांनी सर्व्हे केला; पण मोजक्या शेतकऱ्यांच्या यादीत नाव आलेले आहे. सुमारे २५ शेतकऱ्यांची नावे समाविष्ट करण्यात आली नाही. गारपीटग्रस्त असूनही शासकीय मदतीपासून त्यांना वंचित ठेवण्यात आले.याबाबत शेतकरी तलाठी, तहसीलदार यांना वारंवार भेटले. मात्र कोणीच सहकार्य केले नाही. न्याय मिळवा, याकरिता आपल्याकडे दाद मागत असल्याचे ब्राह्मणवाडा येथील शेतकरी सुभाष अवथळे, नरेश घोडे, गणेश वाघधरे, नीतेश काळे, भीम तेलमोरे, धानू उईके, अर्जुन तेलमोरे, लक्ष्मी वाघधरे, दिनेश घोडे आदींनी निवेदनाद्वारे म्हटले आहे. तसेच जिल्हाधिकारी यांनी निवेदनाची दखल घेत मदत करण्याची मागणी केली जात आहे.(प्रतिनिधी)
अतिवृष्टी, गारपीटग्रस्तांच्या मदत वाटपात घोळ
By admin | Published: June 28, 2014 12:37 AM