आनंद वर्धन शर्मा : राष्ट्रीय युवा स्वयंसेवक प्रशिक्षण शिबीरलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : युवकांमध्ये सत्यनिष्ठा व प्रामाणिकता असायला पाहिजे. युवकांनी कठोर परिश्रम व कर्तव्य दक्षता बाळगल्यास ध्येय प्राप्ती निश्चित होऊ शकते. यासाठी स्वामी विवेकानंदांचे जीवन व संदेश यापासून युवा शक्तीने प्रेरणा घ्यावी, असे मत प्रा. आनंद वर्धन शर्मा यांनी व्यक्त केले.भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय अंतर्गत नेहरू युवा केंद्राच्यावतीने प्रियदर्शिनी महिला महाविद्यालयाच्या सहकार्याने राष्ट्रीय युवा स्वयंसेवक प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. शिबिरात नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ जिल्ह्यातील ६० शिबिरार्थी सहभागी झाले आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रियदर्शिनी महिला महा.च्या प्राचार्य रंभा सोनाये तर अतिथी म्हणून प्रा.डॉ. सोनाली शिरभारते, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक संजय माटे, प्रशिक्षक सतीश इंगोले, लेखापाल दयाराम रामटेके आदी उपस्थित होते. प्रारंभी जिल्हा युवा समन्वयक संजय माटे यांनी मान्यवरांचे सूतमाला देत स्वागत केले. प्राचार्य सोनाये यांनी युवकांमध्ये कठोर मेहनत करण्याची जिद्द व चिकाटी असेल तर यश सहज मिळविता येते. युवकांनी मतदार जागृती, वृक्षारोपण व संवर्धन, जल संवर्धन यावर विशेष कार्य करण्याची गरज आहे, असे सांगितले. प्रा. सोनटक्के यांनी राष्ट्रीय युवा स्वयंसेवक प्रशिक्षण हे एक युवा सामाजिक कार्यकर्ता घडविण्याचे प्रशिक्षण आहे. सामाजिक चळवळीची दिशा यातून मिळते. राष्ट्रीय सेवेत आपला सहभाग दर्शविला पाहिजे, असे सांगितले.यावर्षी नेहरू युवा केंद्र संघटन व टाटा समाज विज्ञान संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने युवा विकास व समाज परिवर्तन सर्टीफीकेट कोर्सचे आयोजन करण्यात आले आहे. १५ दिवसांच्या निवासी शिबिरात शिबिरार्थींना विविध जीवन कौशल्य, केंद्र व राज्य शासनाच्या विकासात्मक योजनांची माहिती, संविधान, संवाद, भाषण कौशल्य, व्यक्तिमत्व विकास, अभ्यास दौरा आदींचा समावेश करून एक स्वयंपूर्ण प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न करण्यात आला.संचालन सतीश इंगोले यांनी केले तर आभार अतुल कातरकर यांनी मानले. कार्यक्रम तथा शिबिराला नेहरू युवा केंद्राचे दयाराम रामटेके, मंगेश डुबे, स्वयंसेवक अमोल चावरे यांच्यासह पदाधिकारी तथा महा.चे कर्मचारी सहकार्य करीत आहे.
कर्तव्य दक्षता व कठोर परिश्रमामुळे ध्येयप्राप्ती निश्चित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 2:26 AM