जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रकार : वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : विविध शासकीय कार्यालयांच्या इमारती, व्यावसायिक संकुल आदींची निर्मिती करताना तेथे वाहनतळाची व्यवस्था करणे क्रमप्राप्त असते. शहरातील बहुतांश शासकीय कार्यालयाच्या परिसरात वाहनतळाची व्यवस्थाही आहे. परंतु, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ज्या ठिकाणी दुचाकी वाहने उभी करावी, असा सूचना फलक आहे त्या ठिकाणी चारचाकी वाहने उभी केली जात असल्याने दुचाकी वाहने थेट नो-पार्किंगमध्ये उभी केली जात आहे. याकडे जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.जिल्हाधिकारी कार्यालयात दररोज विविध कामानिमित्त शेकडो नागरिक येतात. दुचाकीने व चार चाकीने जिल्हाधिकारी कार्यालयात येणारे उन्हाळ्याचे दिवस असल्याने कार्यालय परिसरात येताच वाहन उभे करण्यासाठी कुठे सावली आहे याचा शोध घेतात. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात वाहन तळाची व्यवस्था करण्यात आली असून नागरिकांच्या वाहनांचे ऊन व पावसापासून संरक्षण व्हावे या उद्देशाने तेथे सिमेंटच्या टिनपत्र्याचे शेडही उभारण्यात आले आहे. परंतु, ज्या ठिकाणी दुचाकी वाहने उभी करावी असा फलक लावण्यात आला आहे तेथे थेट चारचाकी शासकीय वाहने उभी केली जात आहे. त्याकडे जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांचेही दुर्लक्ष होत आहे. परिणामी, विविध कामानिमित्त येणाऱ्यांना आपली वाहने कुठे उभी करावी असा प्रश्न या कार्यालयाच्या परिसरात दाखल होताच पडतो.पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात दिव्यांगांना जाण्यासाठी असलेल्या मुख्य द्वाराकडे दुचाकीचालक आपली वाहने उभी करीत होते. परंतु, सध्या या ठिकाणी वाहने उभी करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. तसा फलकही त्या ठिकाणी लावण्यात आला आहे. शिवाय दिव्यांगांना जिल्हाधिकारी कार्यालयात जाण्यासाठी असलेल्या मुख्य द्वाराकडे कुणाचीही दुचाकी जाऊ नये म्हणून तेथे दोरी बांधण्यात आली आहे. पण, ज्या ठिकाणी दुचाकी वाहने उभी केली जायला पाहिजे त्या ठिकाणी चारचाकी वाहनांनी अतिक्रमण केल्याने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सध्या नो-पार्किंगमध्ये दुचाकी वाहने उभी केली जात आहे. त्याकडे जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारीही दुर्लक्ष आहे. वाहनचालकांची अडचण लक्षात घेऊन सदर प्रकाराकडे लक्ष देत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी योग्य कार्यवाही करण्याची मागणी आहे.घ्यावा लागतो वृक्षाच्या सावलीचा आधारजिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील दुचाकीच्या वाहनतळावर चारचाकी वाहनांचे अतिक्रमण होत आहे. परिणामी, दुचाकी चालक नियमांना फाटा देत थेट वाहने नो-पार्किंगमध्ये उभी करीत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात चारचाकी वाहने उभी करण्यासाठी पाहिजे त्या प्रकारचे वाहनतळ नसल्याने बहुतांश चारचाकी चालकांना सध्या झाडाच्या सावलीचा आधार घ्यावा लागत आहे. वाहनचालकांची समस्या लक्षात घेता योग्य कार्यवाहीची गरज आहे.
चार चाकींच्या अतिक्रमणामुळे दुचाकी थेट नो-पार्किंगमध्ये
By admin | Published: May 16, 2017 1:17 AM