डवरणी कामात पतीला पत्नीची मदत : मजुरी टाळण्याकरिता शेतकरी कुटुंब राबतेय शेतातलोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : मजूर आणि शेतीच्या नियोजनासाठी लागणाऱ्या आर्थिक बाबींमुळे ग्रामीण क्षेत्र सध्या संकटात सापडलेले आहे. शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांच्या मालाला भावच मिळत नसल्याने आर्थिक विपन्नता आली आहे. परिणामी, मजूर सांगून शेती करणे शेतकऱ्यांना परवडणारे नसल्याचे दिसते. यावर पर्याय म्हणून पत्नीनेच डवरा हातात घेत डवरणीच्या कामात पतीला सहकार्य केल्याचे चित्र वघाळा शिवारात पाहावयास मिळाले.हमदापूर मार्गावर वघाळा हे गाव असून तेथील शेतकरी गोविंदराव पोपटकर शेती करून संसाराचा गाडा चालवितात. परंपरागत शेती हे जीवन व्यापनाचे साधन आहे. तीन एकर शेतात ते स्वत: पत्नीसह राबतात. शेतात विहीर असली तरी प्रारंभी पाणी कमी लागल्याने चिंतेत भर पडली. दरवर्षीप्रमाणे यंदाही कपाशी, तूर, सोयाबीन इतर पिके शेतात आहे. आर्थिक उत्पन्न वाढावे, कुटुंबाला आर्थिक मदत व्हावी म्हणून तुती लावली. सध्या पीक चांगले असले तरी मजुरांची मोठी समस्या निर्माण झाली आहे. कामे आहे; पण करायला कुणी तयार नाही. शेतात एकाच वेळी डवरणी, निंदण, खते फवारणीची कामे आहे. तण वाढले, शेतात पैसा तरी किती खर्च करणार व आणायचा कुठून हा प्रश्न आहे. शेतातील कामे वेळीच होणे गरजेचे असल्याने गोविंदराव यांची पत्नी रंजना मदतीला आली. शेतात राबणाऱ्या रंजनाने चक्क डवरा हाणून पतीच्या कामाला हातभार लावला. या प्रसंगाने मात्र शेतकरी व त्याचे कुटुंब कोणत्या परिस्थितीचा सामना करीत आहे, याचे जिवंत दर्शन घडविले. पोपटकर यांना दोन मुले असून दोघांना वर्धेत शिकायला भावाकडे ठेवलेले आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती त्यांनी अनुभवली आहे. मुलांच्या वाट्याला ही आर्थिक विपन्नता येऊ नये, त्यांचे शिक्षण व्हावे, असाच प्रयत्न हे पती-पत्नी करीत आहेत.शासनाने व्यथा जाणावीपती-पत्नी शेतात राबतो म्हणून काही पैसा संसारासाठी हाती पडतो. उत्पन्न काढतो; पण शासन मालाला भावच देत नसल्याने नुकसान होते. अन्य वस्तूंचे भाव दरवर्षी वाढतात; पण शेतमालाला भाव नाही. यामुळे आर्थिक संकट असतेच. शासनाने शेतकऱ्यांची व्यथा जाणून घ्यावी, असे मत पोपटकर दाम्पत्य व्यक्त करतात.
आर्थिक विपन्नतेमुळे घरातील महिलाही जुंपली शेतीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 1:07 AM