विक्रीकर विभागाकडून वसुली : कर्मचाऱ्यांचे होणार महसूल विभागात समायोजन लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : गत अनेक वर्षांपासून कोट्यवधीचा करमणूक कर वसूल करणारा जिल्हाधिकारी कार्यालयातील करमणूक कर विभाग बंद होणार आहे. या कराचा अंतर्भाव वस्तू व सेवाकरामध्ये (जीएसटी) करण्यात आला आहे. जीएसटीच्या अंमलबजावणीची जबाबदारी विक्रीकर विभागाकडे सोपविण्यात आली आहे. जीएसटी लागू होण्यास १० दिवस शिल्लक असून जिल्हा प्रशासनाला करमणूक कर विभागाच्या अधिकाऱ्यांना महसूल विभागात इतरत्र विलीन करून घेण्याचे आदेश धडकले आहेत. यामुळे करमणूक कर विभाग संपुष्टात येणार आहे. करमणूक करापोटी प्रशासनाला वर्षाला २ कोटी ३० लाख रुपयांचा महसूल मिळतो. मागील वर्षी करमणूक कर विभागाने १ कोटी ८३ लाखांचा महसूल जिल्हा प्रशासनाला मिळवून दिला होता. जिल्हाधिकारी कार्यालयात करमणूक कर वसुलीसाठी स्वतंत्र विभाग आहे. जिल्ह्यातील चित्रपटगृहे, केबल आॅपरेटर्स, व्हीडीओ गेम पार्लर, अॅम्यूझमेंट पार्क, आनंद मेळावे तसेच वेळोवेळी तिकीट लावून होणारे मनोरंजनात्मक कार्यक्रम यावर करमणूक कराची आकारणी केली जाते. शिवाय त्यांच्या परवान्यांचे नुतनीकरण करणे, कर बुडविणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणे, करमणूक कराची वसुली करतानाच अनधिकृतपणे करमणूक कार्यक्रम कुणी घेत असतील तर त्यांचा शोध घेणे, त्यांची तपासणी करून दंडात्मक कारवाई करणे आदी कामे या विभागामार्फत केली जातात; पण जीएसटी या नवीन कर प्रणालीत अन्य करांसोबतच करमणूक कराचाही समावेश करण्यात आला आहे. राज्य जीएसटी वसुलीचा अधिकार विक्रीकर विभागाला देण्यात आला आहे. परिणामी, जिल्हाधिकारी कार्यालयातील करमणूक कर विभागाकडे कुठलेही काम राहिले नाही. यामुळे हा विभाग बंद होणार असून कर्मचाऱ्यांना महसूल विभागात हलविण्यात येणार आहे. १० दिवसांत होणार अंमलबजावणी १ जुलैपासून जीएसटीची अंमलबजावणी होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. प्रत्यक्षात नवीन करप्रणालीची अंमलबजावणी सुरू होण्यास दहा दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. यामुळे शासनाकडूनही जिल्हाधिकारी कार्यालयातील करमणूक कर विभागाबाबत आदेश धडकले आहेत. करमणूक कर विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना महसूल विभागात अन्यत्र विलीन करण्यात येणार आहे. तत्सम आदेश आल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी मंगेश जोशी यांनी दिली.
जीएसटीमुळे करमणूक कर विभाग संपुष्टात
By admin | Published: June 25, 2017 12:40 AM