वर्धा : मागील २४ तासांत वर्धा जिल्ह्यात ४३९.६४ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली असून सेलू, देवळी तसेच आर्वी तालुक्यात अतिवृष्टीच झाली आहे. जिल्ह्यातील आठही तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने सहा मोठ्या व मध्यम जलाशयातून सध्या पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
मुसळधार पावसामुळे हिंगणघाट तालुक्यातील अल्लीपूर येथील महिला शेतकरी विमल काळे यांच्या शेतातील विहीर खचली. तर अनेक शेतांमध्ये पावसाचे पाणी साचून शेताला तळ्याचे स्वरूप आल्याने उभ्या सोयाबीन, कपाशी पिकावर याचा विपरित परिणाम होत आहे. निम्न वर्धा प्रकल्पाचे ३१ तर बोर धरण प्रकल्पाचे सात दरवाजे उघडण्यात आले आहेत. तब्बल सहा जलाशयांमधून पाण्याचा विसर्ग होत असल्याने नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. वर्धा शहरासह परिसरातील २० गावांना पाणी पुरवठा करणारे महाकाळी येथील धाम प्रकल्प १०० टक्के भरल्याने वर्धेकरांना दिलासा मिळाला आहे.