लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : दोन दिवसांपूर्वी ढगाळी वातावरणामुळे शेतकऱ्यांमध्ये धास्ती भरली होती. काहींनी कापलेल्या तुरीच्या गंजी झाकून ठेवत दक्षता घेतली तर काहींना उपाययोजना करता आल्या नव्हत्या. अखेर रविवारी जिल्ह्यात सर्वदूर अवकाळी पावसाने हजेरी लावली. फारसे गारपीट झाले नसले तरी पावसामुळे गहू, चणा, कपाशीचे नुकसान झाले. सायंकाळी वातावरणातील गारठा वाढला होता.रविवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. सकाळी १०.३० ते १२ वाजताच्या दरम्यान जिल्हाभर अवकाळी पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचे आगमन होताच शेतकºयांत धडकी भरली. शेतात गंजी लावून असलेल्या तुरीच्या ढिगावर प्लास्टिक, ताडपत्री छाकण्यासाठी शेतकऱ्यांना धावपळ करावी लागली. असे असले तरी शेतात उभे असलेले गहू, चणा, कपाशीचे नुकसान मात्र शेतकऱ्यांना रोखता आले नाही. जिल्ह्यातील देवळी, वर्धा, आर्वी, आष्टी, कारंजा, समुद्रपूर, हिंगणघाट व सेलू तालुक्यातही पावसाने हजेरी लावल्याने शेतपिकांचे मोठे नुकसान झाले. सेलू येथे वाऱ्यांमुळे गहू झोपला तर सवंगणी केलेला चणा मातीमोल झाला. जिल्ह्यात घोराड परिसरात तुरळक गारपीट झाले असले तरी त्याचा फारसा प्रभाव जाणवला नाही. यासह पिंपळखुटा, चिकणी (जामणी), आंजी (मोठी) तथा अन्य ठिकाणीही अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले.गहू झोपल्याने उत्पन्न घटणारसेलू परिसरात रविवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. अनेक गावांतील शेतकऱ्यांचा गहू आडवा झाला. वडगाव (कला) येथील कवडू बोबडे, डॉ. दिलीप बोबडे, जगदीश डोळसकर, ज्ञानेश्वर राहुरकर, मनोज तिमांडे, दिनेश बोबडे, संजय, सुभाष, राहुल बोबडे, अभिजीत तितरे, सुनील, प्रमोद, मनीष पाटील, प्रशांत बोबडे, मनोज बोबडे यांचे गहू पिकाचे नुकसान झाले. सेलूसह, घोराड, धानोली, सुकळी, कोटंबा, किन्ही, मोही, ब्राह्मणी येथील शेतकऱ्यांचा गहू पावसामुळे झोपल्याने दाणे भरताना बारिक होऊन उत्पन्नावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.केळझर परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले. शेतातील गहू जमिनदोस्त झाला तर सवंगणीवर आलेल्या चणा व तूर पिकाचे मोठे नुकसान झाले. कापूस भिजल्याने सर्वेक्षण करून नुकसान भरपाईची मागणी आहे.तूर, चणा, कपाशीचे नुकसानआष्टी (श.) परिसरात ढगाळ वातावरण असल्याने शेतकरी चिंतेत होते. यातच रविवारी दुपारी १ वाजता अचानक पाऊस आल्याने तूर व चना पिकाच्या सवंगणी झालेल्या गंजी झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धापवळ झाली. मजूर मिळत नसल्याने अनेक शेतांत कापूस तसाच पडून आहे. शेती पांढरीशुभ्र झाली आहे. काही ठिकाणी चण्याची सवंगणी झाली तर उशिरा पेरणी झालेल्या ठिकाणी शेत हिरवे आहे. गहू, मिरची या पिकांनाही पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. तालुक्यात सर्वत्र पावसाचा हलका शिरवा आल्याने नुकसान झाल्याची माहिती आहे.तुरीचे ढीग झाले ओलेतळेगांव (श्या.पं.) परिसरात हलक्या स्वरुपाचा अवकाळी पाऊस झाला. यामुळे काढणीकरिता शेतात गंजी लावून असलेला तुरीचा ढीग काही प्रमाणात ओला झाल्याने नुकसान अटळ आहे. शेतातील कापूसही ओला तर चण्याचेही मोठे नुकसान झाले. पावसापासून बचावाकरिता उपाययोजना करताना शेतकऱ्यांची चांगली तारांबळ उडाली होती.तूर, चणा, कपाशीचे नुकसानसेवाग्राम परिसरात कापसाची वेचनी, तुरीची काढणी व चण्याची सवंगणी करण्यात शेतकरी व्यस्त होते. दरम्यान, पावसाने व्यत्तय आणला. सकाळपासून शेतकरी माल ओला होऊ नये म्हणून धावपळ करीत होते. शेती बेभरवशाची व माल घरी येईपर्यंत काही खरे नसल्याचा प्रत्यय आज शेतकऱ्यांना आला. महत्प्रयासाने मजूर मिळाल्याने उर्वरित कापूस वेचण्याची घाई शेतकरी करीत होते. हडंब्याने तुरी तर काही ठिकाणी चणा वाळल्याने सवंगणी करून शेतात गंजी लावण्यात शेतकरी व मजूर राबत होते. पण आजच्या पावसामुळे शेतकºयांचे नुकसान झाले.घोराड परिसरात सकाळी ११ ते १२ वाजताच्या सुमारास तुरळक स्वरूपाच्या गारीसह अवकाळी पावसाचे आगमन झाल्याने शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले. पावसाचे प्रमाण कमी असले तरी चणा पिकाची सवंगणी आठवडाभर लांबणार असल्याचे दिसून येते. वेचणीयोग्य कापूस शेतातच ओला झाल्याने उत्पन्नात घट येणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 10:25 PM
दोन दिवसांपूर्वी ढगाळी वातावरणामुळे शेतकऱ्यांमध्ये धास्ती भरली होती. काहींनी कापलेल्या तुरीच्या गंजी झाकून ठेवत दक्षता घेतली तर काहींना उपाययोजना करता आल्या नव्हत्या.
ठळक मुद्देगहू, चण्यासह शेतातील कपाशीचे नुकसान : वातावरणातील गारठ्यात पुन्हा वाढ