साहित्याची नासधूस : पावसामुळे शहरातील नागरिकांची दाणादाण लोकमत न्यूज नेटवर्क आर्वी : शहरातील अनेक रस्ते, नाल्या यांची कामे सुरू आहे. ही कामे अर्धवट असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. गुरूवारी सायंकाळी ५ वाजता शहरात मुसळधार पाऊस आला. नाल्यांतून पाणी वाहून न गेल्याने सांडपाणी नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. यात अनेकांचे नुकसान झाले. पालिका प्रशासनाने त्वरित कामे पूर्ण करणे गरजेचे आहे. शहरात अनेक विकास कामे सुरू आहे. अनेक वॉर्डात सिमेंट रोड तयार करण्यात आले. यामुळे रोड उंच झाले व नाल्यांची कामे केली नाही. काही ठिकाणी नाल्यांची कामे अर्धवट राहिलीत. यामुळे माजी नगराध्यक्ष दुर्गेश पुरोहित यांच्या घरात दोन फुट पाणी साचले होते. त्यांना पाणी बाहेर काढण्यासाठी मोठीच कसरत करावी लागली. त्यांच्या घरालगतच्या जिल्हा सहकारी बँकेतही पाणी शिरले. माजी नगराध्यक्षांच्या घरात पाणी शिरल्याने साहित्याचे नुकसान झाले. रेल्वे स्टेशन वॉर्डातील बबलू चुडीवाल यांच्या अंगणात पाणी शिरल्याने कापूस खराब झाला. रामदेव वॉर्डातील जोशी यांच्या घरात पाणी शिरल्याने संपूर्ण घरात वीज प्रवाहित झाली होती. सुदैवाने अनुचित घटना घडली नाही. साईनगर, गभने, ले-आऊटचे पाणी गांधी विद्यालयाच्या प्रांगणात साचते. नाल्या अरूंद असल्याने शाळेजवळील घरांमध्ये पाणी शिरले. यामुळे अन्न-धान्याचे नुकसान झाले. नवीन ले-आऊटमध्ये नाल्या नसल्याने सांडपाणी रस्त्यावर खोलगट भागात साचते. यामुळे घाणीचे साम्राज्य असून डासांचे प्रमाण वाढल्याने आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पावसादरम्यान, विद्युत दाब वाढल्याने आसोलेनगर येथील अनेकांच्या घरातील लाईट, टीव्ही, फ्रीज, एसी व अन्य विद्युत साहित्य निकामी झाले. वीजही रात्रभर बंद होती. पाऊस व नियोजन नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला. सदर नाल्यांचे काम माजी नगराध्यक्षांच्याच काळातील होते. शिवाय मागणीप्रमाणे त्यांच्या घरासमोर पाईपही टाकून दिले. रस्ता केवळ दुरूस्त केला होता. पाऊस अधिक असल्याने नियोजन अपूरे पडले. पूढील गैरसोय टाळण्यासाठी उपाययोजना केल्या जातील. - प्रशांत सव्वालाखे, नगराध्यक्ष, न.प. आर्वी.
अपूर्ण नाल्यांमुळे सांडपाणी घरांत
By admin | Published: July 02, 2017 12:46 AM