लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मानसिक आजाराने त्रस्त असलेल्या ‘सावित्री’ला रुग्णालयात दाखल करायचे होते...पदरात तीन मुलं...मग करावे कसे...हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता...अखेर ‘उमेद’ संकल्प संस्थेने मदतीचा हात पुढे करीत पुढाकार घेऊन नागपूर येथील मेंटल रुग्णालयात नेले...पण, सावित्रीला कुणीही रुग्णालयात दाखल करुन घेण्यास तयार नव्हते. अखेर सावित्रीच्या मदतीला आमदार बच्चू कडू देवदूत बनून आले. त्यांनी रुग्णालय प्रशासनाला ‘सावित्री’ला दाखल करुन घेण्यास सांगितले. अन् उमेद संकल्पमधील कार्यकर्त्यांनी सावित्रीच्या लहान मुलांना मायेची उब देत प्रकल्पात दाखल केले. सावित्री ही मानसिक आजाराने त्रस्त असल्याने पतीने तिला सोडून दुसरा संसार थाटला. काही दिवसांपूर्वी सावित्रीची लहान मुलगी ‘समृद्धी’ उमेद प्रकल्पात दाखल झाली. तिच्या खांद्यावर दोन भावंडांची जबाबदारी पेलविण्याचे आव्हान होते. तब्बल दीड वर्षे कोणत्याच नातलगांनी त्यांच्याकडे डुंकूनही पाहिले नाही. दोन दिवसांपूर्वी ‘समृद्धी’च्या आत्याचा फोन आला आणि सावित्रीला पागलखान्यात घेऊन जाण्यास सांगितले. उमेद प्रकल्पातील सामाजिक कार्यकर्त्यांनी चौकशी करुन नागपूर येथील रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. ठरल्याप्रमाणे नागपूर येथे नेले. पण, रुग्णालयातील डॉक्टरांनी सावित्रीला दाखल करुन घेण्यास नकार दिला. अखेर सामाजिक कार्यकर्त्यांनी आमदार बच्चू कडू यांना फोन करुन ही बाब सांगितली. कडू यांनी रुग्णालय प्रशासनाला दुरध्वनीवरुन संपर्क साधत रुग्णास दाखल करण्याच्या सूचना दिल्यावर डॉक्टरांनी रुग्णालयात दाखल केले. अन् सावित्रीच्या तिन्ही मुलांना उमेद प्रकल्पात दाखल केले. त्यामुळे सावित्रीला तिचे माहेर मिळाल्याने समाधानाचे वातावरण निर्माण झाले.