दलालांचा सुळसुळाट : खाते उघडण्यासाठीही लागतात २० दिवसझडशी : अधिकारी चांगला असला की, नागरिक, ग्राहकांची कामे सोईस्करपणे होतात; पण अधिकारीच नसले तर कामांचा खोळंबा होतो. सध्या असाच प्रकार येथील सेंट्रल बँक आॅफ इंडियामध्ये घडत आहे. शाखा व्यवस्थापकांची बदली झाली व नवीन अधिकारी देण्यात आला नाही. यामुळे कामे ठप्प झाली असून खातेदारांची बोळवण केली जात असल्याचे दिसते. वरिष्ठांनी याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.झडसी व परिसरातील ४० ते ५० गावांचा व्यावहारिक संपर्क सेट्रल बँक आॅफ इंडियाच्या येथील शाखेशी येतो. पीक कर्ज व इतर कामांसाठी शेकडो ग्राहक स्थानिक बँकेत येतात. बँकेचा व्यवहार वाढावा. कामात सुसज्जता यावी म्हणून बदली होऊन गेलेल्या शाखा प्रबंधकांनी दोन वर्षे अथक प्रयत्न केले. यातून बँक कर्मचाऱ्यांची क्रियाशीलता वाढविली. ग्राहकांना अडचणी येऊ नये म्हणून शासनाने नवीन मोठी इमारत बँकेसाइी भाडे तत्वावर घेतली. यामुळे दलालांना आळा घालण्यास शाखा प्रबंधकाला यश आले होते; पण आता सेंट्रल बँकेच्या शाखेत अधिकाऱ्यांची गळती सुरू झाली आहे. दुसरा अधिकारी येत नसल्याने बँकेतील व्यवहार ठप्प झाले आहेत. साधे खाते काढायचे असले तरी ग्राहकांना १५ ते २० दिवस लागत आहेत. तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगून ग्राहकांची बोळवण केली जाते. शेतकऱ्यांची शेतीची कामे सुरू आहे. यामुळे शेतकरी आर्थिक व्यवहारासाठी बँकेत येतात. या शेतकऱ्यांना लगेच दलाल हेरून घेतात. आपली कामे त्वरित करून देतो, असे म्हणत पैसे उकळतात. हा प्रकार पुन्हा वाढीस लागल्याने शेतकरी त्रस्त आहे.शाखा व्यवस्थापकाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. कुठलाही व्यवहार १५ ते २० मिनिटांत संपत होता. आता त्याला १५ ते २० दिवस लागतात. यामुळे ग्राहक आश्चर्य व्यक्त करतात. या प्रकारांमुळे दलालांचा व्यवसाय मात्र जोरात सुरू आहे. यात अधिकारी, कर्मचारी तर सामील नाही ना, असा संशय ग्राहक उपस्थित करतात. याकडे लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे झाले आहे.(वार्ताहर)
अधिकारीच नसल्याने बँकेत खातेदारांची बोळवण
By admin | Published: August 22, 2016 12:32 AM