बैलजोड्यांची संख्या रोडावली : सीआेंसह नगरसेवकांची अनुपस्थितीपुलगाव : गत काही महिन्यांपासून नगराध्यक्षासह पाच नगरसेवकांवर असलेली अपात्रतेची टांगती तलवार दोन दिवसापूर्वीच हटली. मात्र पालिकेच्या सत्तारूढ गटात असलेली राजकीय स्पर्धा पोळ्याच्या सणात दिसून आले. पोळ्याचे आयोजन पालिकेच्यावतीने असले तरी येथे पालिकेचे अधिकारी वा पदाधिकारी अनुपस्थित असल्याचे दिसून आले. शहरात पालिकेच्यावतीने बैल पोळ्याचे आयोजन पालिका प्रशासनाने केले. या पोळयात २१ पैकी केवळ नगराध्यक्षासह तीनच नगरसेवक उपस्थित होते. मुख्याधिकारी डॉ. मेघना वासनकर यांचीही अनुपस्थिती होती. शिवाय १२ पैकी एकाही नगरसेविकेची या कार्यक्रमात उपस्थिती नव्हती. राजकीय सावटाचा परिणाम पोळ्यातील बैलजोड्यांवरही झाल्याचे दिसून आले. पोळ्यात बैलजोड्यांची संख्याही रोडवल्याचे दिसून आले.स्थानिक आठवडी बाजारात आयोजित या बळीराजाच्या उत्सवप्रसंगी केंद्रीय दारूगोळा भांडाराचे डेप्युटी कमांडंट टी. आर. बेहरा, प्रशासकीय अधिकारी लेप्ट. कर्नल अजय फुंडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी कोल्हे, नगराध्यक्ष मनिषकुमार साहू, नगरसेवक राजीव बतरा व सुनील ब्राम्हणकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. बैलांची सुदृढता सजावट या निकषावर पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. पारितोषिकासाठी पोळ्यात सहभागी असलेल्या बैल जोड्यांतून काही बैल जोड्यांची परीक्षण मंडळाने निवड केली. यावेळी प्रथम पुरस्कार जगदीश काळे यांच्या बैलजोडीने पटकाविली. तर द्वितीय व तृतीय पुरस्कार अनुक्रमे अरूण चौधरी व विवेक बुल्हे यांच्या बैलजोडीने पटकाविले. प्रोत्साहनपर पारितोषिकासाठी मोरेश्वर गाधणे, गजानन नेहारे, कांता पनपालिया यांच्या बैल जोड्यांनी वर्णी लागली. प्रमुख अतिथीच्या हस्ते पारितोषिक वितरण संपन्न झाले. शेतकऱ्यांच्या ग्रामीण जीवनावरील झडत्यांनी संपूर्ण परिसर गजबजून गेला होता. कार्यक्रमाला सुभाष श्रीपतवार, आनंद ढवळे, अनिल अंबादे, दिलीप लांडगे, अनिल ताजणे, मनोज खोडे, सुनिल मलिक यांच्यासह नगर परिषद कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. या सर्व बैलजोडी मालकांचा पालिका प्रशासनाने दुपट्टा व श्रीफळ देवून सन्मान केला. अतिथींचाही सत्कार झाला. कार्यक्रमाचे संचालन विठ्ठल वानखेडे यांनी केले.(तालुका प्रतिनिधी)
पुलगावच्या बैल पोळ्यावर नगर पालिका राजकारणाचे सावट
By admin | Published: September 03, 2016 12:18 AM