ठाणेगावातून लुटले होते २.३६ कोटी सोमवारपासून आरोपींकडील युक्तीवाद लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : अकोला येथून नागपूरकडे रोकड घेऊन जाणारे वाहन नागपूर-अमरावती मार्गावरील ठाणेगाव शिवारात अडवून चोरट्यांनी नियोजनबद्धरित्या लुटली होती. यातील २.३६ कोटींची रोकड लंपास करण्यात आली होती. हे बहुचर्चीत कॅश व्हॅन लूट प्रकरण न्यायप्रविष्ट असून यातील शासकीय युक्तीवाद शनिवारी संपुष्टात आला. सोमवारपासून आरोपींचे वकील त्यांची बाजू मांडणार असल्याचे सांगण्यात आले आहे. अकोला येथून रोकड घेऊन निघालेली कॅश व्हॅन ७ मार्च २०१३ रोजी नागपूर-अमरावती महामार्गावरील ठाणेगाव शिवारात काही अज्ञात चोरट्यांनी अडविली. वाहनातील २ कोटी ३६ लाख ५० हजारांची रोकड चोरट्यांनी यशस्वीरित्या पळविली होती. सदर प्रकरणी तक्रार प्राप्त होताच कारंजा (घा.) पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेत तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी सदर प्रकरणातील आरोपी चंद्रशेखर सुब्रमण्यम मुदलीया, सल्लू कुमार उर्फ सेलवा कुमार (काऊंडर), रसीम शेख, शैलेश उर्फ रवी मसराम, सचिन श्रीवास्तव, सय्यद मकसूद अली, शेख मुशताख उर्फ समीर शेख हबीब, रेहान बेग, शाकीर हुसेन, रवींद्र उर्फ रवी माडेकर, मंगल उर्फ सत्यप्रकाश यादव, प्रशांत वाघमारे, रवी उर्फ छोटू बागडे, मोहन सादीक, सुलेमान सूर्या, नोबीन अहमद खान, शेख अलताफ, वैभव उर्फ पिंटू बिजेवार, साधना इटले, अश्वितसिंग उर्फ सोनू चव्हाण, पंकज उर्फ गब्बर कनोजे, मोहम्मद तबसीन, मोहम्मद शमीम, विजय उर्फ विजू सोनेकर यांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले होते. सदर आरोपींकडून पोलिसांनी जवळपास १ कोटी ९० लाख रुपयांची रोकड व सोन्याचे प्रत्येकी १०० ग्रॅम वजनाचे एकूण तीन बिस्कीट जप्त केले होते. तपासात आरोपींनी नियोजनबद्ध कट रचल्याचे तपासात समोर आले. या प्रकरणाचा तपास पूर्ण करून पोलिसांनी प्रकरण न्यायप्रविष्ट केले. हे प्रकरण न्यायदानासाठी जिल्हा सत्र न्यायालय तीन मध्ये असून आतापर्यंत जिल्हा सत्र न्यायाधीश अनिरूद्ध चांदेकर यांच्या समक्ष शासकीय ५० तर आरोपींच्या बचावाचे दोन साक्षदार तपासण्यात आले आहेत. शनिवारी या प्रकरणातील शेवटचा शासकीय युक्तीवाद संपुष्टात आला आहे. आता सोमवारपासून आरोपींचे वकील आरोपींच्या बचावासाठी युक्तीवाद करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. सदर प्रकरणामध्ये शासनाकडून अॅड. व्ही.आर. घुडे यांनी न्यायालयात प्रभावीपणे युक्तीवाद केला आहे.
कॅश व्हॅन लूट प्रकरणातील शासकीय युक्तीवाद संपुष्टात
By admin | Published: June 18, 2017 12:38 AM