डागडुजीचा पत्ताच नाही : पर्यटक व्यक्त करतात संतापवर्धा : धाम नदीचे बारमाही प्रवाही पात्र आणि विनोबा आश्रम यामुळे पवनारला नैसर्गिक आणि वैचारिक अधिष्ठान प्राप्त झाले आहे. त्यामुळेच पवनारला पर्यटनस्थळाचा क दर्जाही देण्यात आला आहे. पण या स्थळावर जाण्यासाठी पवनार येथील धाम नदीपात्रावर असलेला जुना पूल पर्यटकांसाठी अतिशय धोक्याचा ठरत आहे. पुलावरील मोठमोठे खड्डे आणि कठड्यांचा अभाव यामुळे शासनाची उदासीनताही प्रत्ययास येत आहे. पवनार येथील विनोबा आश्रमला दरवर्षी हजारो पर्यटक भेट देतात. आलेले पर्यटक केवळ आश्रमलाच भेट देत नाही तर धामचे खळाळते पात्रही त्यांना भुरळ घालत असते. येथे जाण्यासाठी धाम नदीवरील लहान पुलाचा मुख्यत्वे उपयोग केला जातो. पण या काही वर्षात नवीन पुलामुळे जुन्या पुलाकडे सातत्याने दुर्लक्ष झाले आहे. या पुलावरील लोखंडी कठडे कायमचे नामशेष झाले आहे. विशेष म्हणजे या पुलावर मोठमोठे खड्डे पडले असून ते धोक्याचे ठरत आहे.सदर खड्डे चुकविण्याच्या नादात वाहनचालक सरळ नदीत पडण्याचा धोका आहे. अश्या घटना अनेकवार घडल्याही आहेत. मोठ्या पुलावरही खड्ड्यांची मालिका आणि सातत्याने होत असलेली जड वाहतूक यामुळे पर्यटक लहान पुलावरूनच जाणे पसंत करतात. मोठ्या पुलावरून वळसा घालून येण्यापेक्षा लहान पूल सोयीचा असल्यानेही पर्यटक लहान पुलालाच पसंती देतात. पण त्यावर पडलेले भलेमोठे भगदाड अपघातास कारण ठरत आहेत. पर्यटनाचा क दर्जा असतानाही आणि आश्रम परिसरात जाण्यासाठी लहान पुलाचा जास्त उपयोग होत असतानाही त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. परिणामी पर्यटकांसह गावातील नागरिक आश्चर्य आणि संताप व्यक्त करीत असून पुलाच्या दुरुस्तीची मागणी होत आहे.(शहर प्रतिनिधी)
पर्यटकांसाठी पूल ठरतोय धोक्याचा
By admin | Published: July 06, 2016 2:31 AM