शेतकरी चिंतातूर : कर्ज घेत करावी लागणार पुन्हा पेरणी लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा/सेवाग्राम : यंदा समाधानकारक पाऊस येणार हे भाकित लक्षात घेत शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली; पण पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यात बहुतांश शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे सावट आहे. परिणामी, शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. काहींनी अद्याप पेरण्या केल्या नाही. सदर शेतकऱ्यांना विलंबाने पेरणीचा फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पावसाने दडी मारली आणि उन्ह तापत आहे. यामुळे पिके धोक्यात आली असून बळीराजावर चिंतेचे सावट पसरले आहे. शेतकऱ्यांनी शेतीचे नियोजन केले. आर्थिक डबघाईस आलेल्या शेतकऱ्यांनी समाधानकारक पावसावर कपाशी, तुरीची लावण व ज्वारी, सोयाबीनची पेरणी केली. पिके ओलव्यामुळे जमिनीच्या वर आलीत; पण पावसाने दडी मारली. सूर्य तळपू लागला आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. सध्या पिके चांगली असून बहुतांश शेतकऱ्यांची डवरणीही सुरू झाली आहे; पण काही दिवसांपासून पावसाने हुलकावणी दिल्याने अंकूर कोमेजण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जमिनीतील ओलावा कमी होत असून डवरणी झाल्याने शेतात वाळण येत आहे. यामुळे धोका होण्याची शक्यता आहे. डोब आल्याने शेतकऱ्यांनी कपाशी व तुरीची लावण केली; पण नंतर पावसाचा पत्ताच नसल्याने शेतकरी धास्तावला आहे. पाऊस या आठवड्यात झाला नाही तर संपूर्ण शेतीच धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. शासनाची घोषणा आणि बँकांचे असहकार्य शेतकऱ्यांच्या विवंचनेत भर टाकणारे ठरत आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकरी वरुण देवाची आळवणी करीत असल्याचे पाहावयास मिळत आहे. कर्जासाठी वणवण शासनाचा कर्जमाफीचा निर्णय शनिवारी झाला. असे असले तरी अद्याप बँकांना आदेश नाहीत. शिवाय १० हजार रुपयांच्या कर्जाबाबतही निर्देश नाहीत. यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी सावकारांचे उंबरठे झिजवित कर्ज मिळवावे लागणार असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येते.
पावसाच्या दडीने दुबारचे सावट
By admin | Published: June 26, 2017 12:36 AM