दुर्गंधीमुळे नागरिक हैराण : रविवारचे स्वच्छता अभियानही निरूपयोगीवर्धा : शहरातील अंतर्गत गटार व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. रस्त्याच्या कडेला नाल्यांचे बांधकाम केले जात असले तरी जुन्या गटारांकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. परिणामी, दुर्गंधीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. प्रभाग क्र. १८ मध्ये रविवारचे स्वच्छता अभियान पालिका प्रशासनाने राबविले; पण गटार व दुर्गंधी कायम असल्याने आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. नगर पालिका प्रशासनाकडून शहरात विकास कामे केली जात आहेत. यात अनेक भागात रस्ते, नाल्यांची कामे करण्यात आलीत; पण बहुतांश भागातील जुन्या समस्याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसते. जीर्ण झालेल्या नाल्या, सदोष गटारे अद्याप जैसे थे आहेत. त्या नाल्यांऐवजी नवीन नाल्यांची निर्मिती करण्यात आली नाही. शिवाय गटारांमध्येही सुधारणा करण्यात आली नाही. यामुळे अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. प्रभाग क्र. १८ मधील वॉर्ड क्र. २८ मध्ये बौद्ध विहाराजवळ असलेल्या गटारामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. नाल्या नसल्याने या भागात सांडपाणी साचते. निचरा होत नसल्याने सांडपाण्याचे मोठे गटारच निर्माण झाले आहे. यातच घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याने परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. न.प. प्रशासनाकडून प्रत्येक रविवारी प्रत्येक प्रभागात स्वच्छता अभियान राबविले जात आहे. प्रभाग क्र. १८ मध्येही स्वच्छता अभियान राबविण्यात आले; पण गटाराकडे लक्ष देण्यात आले नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. पालिका प्रशासनाने याकडे लक्ष देत नाल्यांची निर्मिती करीत सांडपाणी वाहते करणे गरजेचे आहे.(कार्यालय प्रतिनिधी)दहा वर्षांपासून त्या भागात नाल्याच नाहीस्थानिक अशोक नगर प्रभाग क्र. १८ अंतर्गत येणाऱ्या वॉर्ड क्र. २८ मध्ये मागील दहा वर्षांपासून नाल्यांची निर्मिती करण्यात आलेली नाही. परिणामी, बौद्ध विहाराजवळ गटार निर्माण झाले आहे. सांडपाणी जायला जागा नसल्याने घाणीचे साम्राज्य वाढत आहे. यामुळे येथील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. दिवसागणिक गटार व घाणीमध्ये वाढ होत असल्याने दुर्गंधी पसरली असून विविध आजार डोके वर काढत असल्याचे दिसून येत आहे. वर्धा नगर पालिकेद्वारे प्रत्येक रविवारी स्वच्छ वर्धा अभियान राबविले जात आहे. यात नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांनी अशोक नगर येथे भेट दिली असता नागरिकांनी समस्या मांडल्या; पण त्यावर उपाययोजना करण्यात आली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला ओह. पालिका प्रशासनाने नागरिकांची ही समस्या दूर करावी, अशी मागणी युवा परिवर्तन की आवाज संघटनेने केली आहे. याबाबत सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.या गटाराबाबत उपाययोजना न केल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही संघटनेने दिला आहे. निवेदन देताना जिल्हाध्यक्ष पलाश उमाटे, शहर अध्यक्ष गौरव वानखेडे, धरम वोंडे, साहिल नाडे, आकाश हातागळे, रवींद्र शेंडे, सौरभ गायकवाड, ऋषिकेश चौकोने, बबन उपाध्याय, हेमंत भोसले, शैलेश गिरी, अरहान शेख आदी उपस्थित होते.
गटारांमुळे घाणीचे साम्राज्य
By admin | Published: April 25, 2017 1:00 AM