हिंगणघाट : पावसाच्या चांगल्या सुरूवातीने सुखावलेले शेतकरी नव्या उमेदीने शेतीच्या कामांना लागले. पेरणीनंतरची डवरणी, निंदणाची कामे सुरू झाली आहेत; पण मजुरांची संख्या सिमीत असल्याने शेतकरी त्रस्त आहेत. मजुरांच्या तुटवड्यामुळे शेतातील कामांचा खोळंबा होत आहे. खरीप हंगामात अतिवृष्टी झाली. काही ठिकाणी दुबार पेरणी करावी लागली. काळ्या मातीतून वर आलेल्या पिकांना जगविणे आणि वाढविण्यासाठी आता पेरणीनंतरची कामे सुरू आहेत; पण शेतकऱ्यांसमोर मजुरांचा प्रश्न उभा ठाकला आहे. मजुरांची अपूरी संख्या व मजुरीत होणारी वाढ, या दोन्हीचा परिणाम शेतीच्या खर्चावर होत आहे. काही शेतकरी अधिक पैसे मोजून मजूर आणत आहेत तर काही शेतांतील कामे खोळंबली आहेत. स्वत: राबल्यानंतरही अन्य मजुरांची गरज पडते, हे वास्तव आहे. मजुरांना शेतात ने-आण करण्याची व्यवस्थाही शेतकऱ्यांना करावी लागते. मजुरांची संख्या कमी असल्याने विविध गावांतून त्यांना शेतात आणावे लागते. यासाठी वेळ आणि पैशाची तरतूद करावी लागत आहे. यात कधी वेळेवर ते शक्य होत नसल्याने समस्या वाढत आहे. पिकांवर किटकनाशकांची फवारणी करणे, निंदण, खुरपणासाठी मजुरांची गरज असते. नांगरणी, वखरणी, डवरणी आदी कामे ट्रॅक्टरने केली जातात. परिसरात, सोयाबीन, कपाशी, तूर ही पिके आहे. यातील निंदणासाठी मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांची फरफट होत आहे.(शहर प्रतिनिधी)
शेतमजुरांच्या कमतरतेने कामांचा खोळंबा
By admin | Published: July 27, 2016 12:12 AM