महेश सायखेडे
वर्धा : वर्धा जिल्ह्यातील तीन नदींसह राज्यातील १०७ नदी अमृतवाहिनी व्हाव्यात या हेतूने चला जाणूया नदीला हे अभियान शासनाने हाती घेतले आहे. या अभियानाचा श्रीगणेशा राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच आचार्य विनोबा भावे यांची कर्मभूमी राहिलेल्या वर्धा जिल्ह्यातून झाला. या अभियानात जिल्ह्याचे स्थळ असलेल्या वर्धा शहरासह परिसरातील तेरा गावांची तृष्णातृप्ती करण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या धाम नदीचा समावेश आहे. शिवाय वर्धा जिल्ह्यातीलच यशोदा आणि वणा नदीचाही समावेश करण्यात आला आहे. धाम नदीची संवाद यात्रा नुकतीच पूर्ण झाली; पण तब्बल २५ विभागांच्या अधिकाऱ्यांच्या लेटलतिफीमुळे 'धाम' नदी अमृतवाहिनी होण्याचा 'सूक्ष्म आराखडा' सध्या अपूर्ण आहे.
वर्धा तालुक्यातील पवनार येथे धाम नदीच्या तीरावर आचार्य विनोबा भावे यांचे आश्रम असून या नदीला ऐतिहासिक महत्त्वही आहे. त्यामुळे वर्धा जिल्ह्यातील ही नदी प्रामुख्याने अमृतवाहिनी व्हावी अशी अपेक्षा अनेकांना आहे; पण संबंधित २५ विभागांचे अधिकारी दुर्लक्षित धोरण राबविण्यात धन्यता मानत असल्याने जिल्हा प्रशासनानेही कठोर भूमिका घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
दीड महिन्यात झाली धामची संवाद यात्रा पूर्ण
धाम नदी संवाद यात्रेला कारंजा तालुक्यातील धामकुंड येथून २० मार्चला सुरूवात झाली. धाम नदीच्या काठावरील तब्बल ४५ गावांत ही यात्रा जात सुमारे दीड लाख नागरिकांना प्रदूषणमुक्त धाम नदीचे महत्त्व पटवून देण्यात आले. या संवाद यात्रेचा समारोप ३ मे रोजी समुद्रपूर तालुक्यातील सुजातपूर येथे झाला असला तरी अद्यापही आवश्यक माहिती संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी नदी प्रहरीला दिली नसल्याने धाम अमृतवाहिनी होण्याचा सूक्ष्म आराखडाच तयार झालेला नाही.
जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रांनाही पाठ
संबंधित २५ विभागांच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे असलेली धाम नदीबाबतची आवश्यक माहिती नदी प्रहरीला द्यावी. शिवाय तातडीने सूक्ष्म आराखडा तयार करीत तो शासनाला सादर करता येईल यासाठी विशेष प्रयत्न करावे अशा आशयाचे पत्र या २५ विभागांच्या अधिकाऱ्यांना खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे; पण जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्राला संबंधित अधिकारी केराची टोपली दाखविण्यात धन्यता मानत आहेत.
धाम नदी प्रहरी म्हणून दोन तज्ज्ञ सांभाळताहेत जबाबदारी
ज्येष्ठ वृक्षमित्र तथा निसर्ग प्रेमी मुरलीधर बेलखोडे आणि जलतज्ज्ञ माधव कोटस्थाने यांच्याकडे धाम नदीची प्रहरी म्हणून जबाबदारी आहे; पण त्यांनाही अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
धाम नदी समन्वयक म्हणून बरीच मदत आम्हाला मिळाली आहे. सततच्या पाठपुराव्यानंतर निम्म्याहून अधिक माहिती प्राप्त झाली आहे. लवकरच आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना धाम नदी अमृतवाहिनी होण्याचा सूक्ष्म आराखडा जिल्हाधिकाऱ्यांना सादर करू.
- मुरलीधर बेलखोडे, प्रहरी, धाम नदी.