लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आरोग्य विभागाच्या गट ‘ड’ संवर्गाची परीक्षा रविवारी दुपारी २ ते ४ या वेळेत जिल्ह्यातील तब्बल २५ केंद्रांवरून घेण्यात आली. जिल्ह्यातील पंचवीसही केंद्रांवरून परीक्षा शांततेत पार पडली असली तरी जिल्हा सामान्य रुग्णालयात परीक्षेचे औचित्य साधून तयार करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षालाच रविवारी नेमक्या किती परीक्षार्थ्यांनी परीक्षा दिली याची माहितीच दुपारी ४.३० वाजेपर्यंत नव्हती. त्यामुळे नियोजनशून्य कारभारामुळे परीक्षेतील सावळा गाेंधळ कायम राहिला, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. जिल्ह्यातील २५ केंद्रांवरून तब्बल ६ हजार ९३० परीक्षार्थी आरोग्य विभागाच्या गट ‘ड’ संवर्गाची परीक्षा देणार असल्याने त्यासाठीची संपूर्ण तयारी शनिवारीच सायंकाळपर्यंत पूर्ण करण्यात आली. रविवारी जिल्ह्यातील २५ केंद्रांवरून प्रत्यक्ष परीक्षा घेण्यात आली असली तरी कुठल्या केंद्रावर किती परीक्षार्थी उपस्थित तर किती गैरहजर राहिले याची माहिती परीक्षा सुरू झाल्यावर तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात तयार करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षाकडे वेळीच येणे अपेक्षित होते. परंतु, परीक्षा संपून अर्धा तास होऊनही सदरची माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयातील नियंत्रण कक्षाकडे नव्हती. त्यामुळे आरोग्य विभागाच्या गट ‘ड’ संवर्गाची वर्धा जिल्ह्यात पारदर्शी परीक्षा पार पाडून घेण्याची जबाबदारी असलेल्या जिल्हा शल्यचिकित्सकांच्या कार्यप्रणालीवर आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
अनेक तरुण-तरुणींची परीक्षेकडे पाठ- जिल्ह्यातील २५ केंद्रांवरून आरोग्य विभागाची परीक्षा शांततेत पार पडली असली तरी या परीक्षेला अनेक परीक्षार्थ्यांनी पाठ दाखविण्यातच धन्यता मानली. नेमक्या किती परीक्षार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली तसेच किती परीक्षार्थी गैरहजर राहिले याची माहिती जाणून घेण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सकांशी त्यांच्या कार्यालयात जाऊन संपर्क साधला असता त्यांच्यासह जिल्हा सामान्य रुग्णालयातील नियंत्रण कक्षाकडे दुपारी ४.३० वाजेपर्यंत सदर माहिती आलेली नसल्याचे सांगण्यात आले.
२६ दिव्यांगांचा होता समावेश- २६ केंद्रांवरून गट ‘ड’ संवर्गाची परीक्षा देणाऱ्यांमध्ये २६ दिव्यांगांचा समावेश होता. पण रविवारी यापैकी नेमक्या किती दिव्यांग बांधवांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली याचीही माहिती दुपारी ४.३० पर्यंत नियंत्रण कक्षाकडे नव्हती.
वर्धा जिल्ह्यात नेमक्या किती परीक्षार्थ्यांनी परीक्षा दिली याची माहिती अद्याप आपल्याला प्राप्त झालेली नाही. सदर माहिती ठेवण्यासह पारदर्शी परीक्षा पार पडावी याची जबाबदारी सीएसवर आहे.- संजय जयस्वाल, उपसंचालक, आरोग्य विभाग, नागपूर.