लोकमत न्यूज नेटवर्कझडशी : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचे काम तालुक्यात युद्धपातळीवर सुरू आहे. या कामाकरिता लागणारे गौणखनिज ग्रामीण भागातील बरड असलेल्या भागातून खोदून रात्रं-दिवस वाहतूक सुरू आहे. यामुळे रस्त्याची पुरती वाट लागल्याने शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.महामार्गाकरिता जड वाहनांची शेतशिवारातील रस्त्यांवरून मोठ्या प्रमाणात ये-जा वाढली आहे. सद्यस्थितीत समृद्धी महामार्गाचे सूरगाव परिसरात काम सुरू आहे. या मार्गाकरिता लागणारा मुरूम झडशी येथील मौजा गिरोली परिसरातील शेती विकत घेत मुरूम ट्रकद्वारे नेण्याचे काम जोरात सुरू आहे. मुरूम वाहतूक येळाकेळी फाटा ते बाभूळगाव मार्गे डांबर मार्गाने न करता हिवरा शेतशिवारातून होत आहे. मदन उन्नई डावा मुख्य रस्ता पाटबंधारेच्या कर्मचारी व शेतकऱ्यांना वहिवाटीसाठी निर्माण केला आहे.महामार्गाच्या कामावरील ट्रक येथून धावत असल्याने रस्ता दोन्ही बाजूने संपूर्णपणे दबला आहे. यामुळे शेतकऱ्यांची वहिवाट अडचणीत आली आहे.सध्या शेतीकामे सुरू असून शेतकऱ्यांना शेतीपयोगी साहित्य अक्षरश: डोक्यावर वाहून न्यावे लागत आहे. मध्यंतरी पावसाने बरेच दिवस उघडीप दिली होती. या दरम्यान मार्गाने जाणाऱ्या ट्रकमुळे उडणारी धूळ रस्त्यालगत असणाऱ्या पिकावर बसत होती. यामुळे अनेक पिके खराब झाली, शिवाय कालव्याचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. पाटबंधारे विभागाची कुठलीही परवानगी न घेता कालव्यावरून सर्रास जड वाहनांचे आवागमन सुरू आहे. त्यामुळे नुकसानभरपाई कोण देणार, संबंधित अधिकारी गप्प का असा प्रश्न शेतकरी व परिसरातील नागरिक उपस्थित करीत आहेत. जिल्हा प्रशासनाने लक्ष देत या सर्व प्रकाराला तत्काळ आळा घालावा, अशी मागणी झडशी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.कंत्राटदाराचा मनमर्जी कारभार; शेतकऱ्यांना मनस्तापशेतशिवारातील रस्त्याची दैना झाल्याने शेतकऱ्यांना बैलबंडी रस्त्यावरच उभी करून खत व शेतीपयोगी साहित्य डोक्यावर दूरपर्यंत वाहून न्यावे लागत आहे. केवळ कंत्राटदाराच्या मनमर्जी कारभारामुळे शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. पर्यायी रस्ता नसल्याने शेतकऱ्यांसमोर यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे. पाऊस सुरु झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी भर पडल्याचे चित्र आहे.गौणखनिज घेऊन जाणाऱ्या वाहनांची ये-जा बंद करण्यास सांगितले असता कंत्राटदाराने कालव्यावर मुरूम टाकून देतो, असे सांगितले. काही ठिकाणी मुरूम टाकलेला आहे. त्यामुळेच वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. यामुळे आणखी काही दिवस शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागेल.- ए. राऊत, शाखा अभियंता, पाटबंधारे विभाग, मदन उन्नई, वर्धा.
समृद्धी महामार्गाच्या कामामुळे शेतकऱ्यांची वहिवाट बिकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 11:28 PM
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचे काम तालुक्यात युद्धपातळीवर सुरू आहे. या कामाकरिता लागणारे गौणखनिज ग्रामीण भागातील बरड असलेल्या भागातून खोदून रात्रं-दिवस वाहतूक सुरू आहे. यामुळे रस्त्याची पुरती वाट लागल्याने शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
ठळक मुद्देकालव्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान : अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष