निकृष्ट दर्जाचे काम : रस्त्याच्या बांधकामाची चौकशी करण्याची मागणी, ग्रामस्थांमध्ये संतापतळेगाव (टा.) : वर्धा ते हिंगणघाट रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली होती. खड्डेमय रस्त्यामुळे जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत होता. ही बाब लक्षात घेऊन संबंधित विभागाकडून डांबरीकरण करण्यात आले; पण ते अल्पावधीतच उखडले. यामुळे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप करीत नागरिकांनी संताप व्यक्त केला. याकडे लक्ष देत रस्ता बांधकामाची चौकशी करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.वर्धा ते हिंगणघाट मार्गावर वायगाव, नेरी, मिरापूर, सेलू काटे, इंझापूर, भुगाव, तळेगाव, सोनेगाव, धोत्रा परिसरात अनेक वर्षांपासून खड्डे पडले होते. यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत घेवून वाहन चालवावे लागत आहे. या मार्गावर आतापर्यंत लहान-मोठे अपघात झालेत. यामुळे गत काही महिन्यांपासून रस्त्यावर गिट्टी टाकून नव्याने डांबरीकरण करण्यात येत आहे; पण डांबरीकरण होताच काही ठिकाणी रस्ता उखडला आहे. सर्वत्र डांबरीकरण उखडून रस्त्यावर गिट्टी विखुरली आहे. यामुळे गत एक-दोन दिवसांत सुलतानपूर फाट्याजवळ हनुमान मंदिराजवळ गिट्टी उखडलेल्या ठिकाणी अनेक जन गाडीवरून घसरून पडले. नव्याने डांबरीकरण होऊनही दोन-चार दिवसांतच उखडल्याने रस्त्याच्या बांधकामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या मार्गावर गिट्टी उखडलेल्या ठिकाणी पुन्हा मलमपट्टी करण्यात येत आहे. रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण होण्यापूर्वीच दुरूस्तीची वेळ आल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहे. रस्त्याच्या दुरूस्ती कामात डांबराचा वापर केला होता की नाही, अशी शंकाही नागरिक उपस्थित करू लागले आहेत. वास्तविक, हा राज्यमार्ग असल्याने दर्जेदार बांधकामाची अपेक्षा केली जाते; पण प्रत्येक वेळी निकृष्ट साहित्याचा वापर करीत कामे केली जात असल्याने रस्त्यावर अवकळा येत असल्याचे दिसते. आता डांबरीकरणाचे काम पूर्ण होण्यापूर्वीच रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडून गिट्टी पसरली आहे. यामुळे वाहन चालकांना अपघाताला सामारे जावे लागत आहे. गिट्टीवरून रस्ता शोधताना दुचाकी घसरून चालक जखमी होत आहेत. या रस्त्याच्या बांधकामाची संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करावी, संबंधित कंत्राटदाराला जाब विचारून दर्जेदार रस्त्याची निर्मिती करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.(वार्ताहर)अपघाताच्या घटनांमुळे वाहन चालक त्रस्तवर्धा ते हिंगणघाट हा राज्यमार्ग आहे. या रस्त्याची गत कित्येक वर्षांपासून दुरवस्था झाली असून खड्डे पडले आहेत. या रस्त्याची अनेकदा डागडुजी करण्यात आली. वर्धा ते वायगाव मार्गाचे डांबरीकरणही करण्यात आले होते; पण अल्पावधीतच रस्त्यावर पुन्हा खड्डे पडले. सध्या वायगाव ते हिंगणघाट दरम्यान डांबरीकरण सुरू असून ‘पुढे पाठ, मागे सपाट’, अशी स्थिती पाहायला मिळते. काम पूर्ण होण्यापूर्वीच डांबरीकरण उखडत असून गिट्टी रस्त्यावर पसरली आहे. या गिट्टीवरून घसरून अनेक दुचाकी चालकांचा अपघात झाला. गत दोन-तीन दिवसांपासून या घटनांमध्ये वाढ होत आहे. या रस्त्याचे दर्जेदार बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.
अल्पावधीतच उखडले वर्धा-हिंगणघाट मार्गावरील डांबरीकरण
By admin | Published: January 17, 2017 1:09 AM