संबंधितांना निवेदन : मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास तीव्र आंदोलन वर्धा : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या अभियंत्यांनी बोरगाव (मेघे) येथील महावितरणच्या कार्यालयासमोर सबॉर्डिनेट इंजिनिअर असोसिएशन (एमएसईबी) च्या नेतृत्त्वात विविध मागण्यांसाठी गुरुवारी धरणे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनादरम्यान विविध मागण्यांचे निवेदन संबंध अधिकाऱ्यांना देण्यात आले असून मागण्यांचा विचार न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. अभियंता विकास पानसरे यांच्या आत्महत्येस कारणीभूत अधीक्षक अभियंता सोलापूर व कार्यकारी अभियंता सोलापूर (ग्रा.) यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, तिन्ही कंपनीतील वर्क नॉर्म्स ठरविण्यात यावे, तिन्ही कंपनीतील अभियंत्यांच्या कामाचे तास ठरविण्यात यावे, माहिती संकलनाची यंत्रणा ठरविण्यात यावी, सभा घेण्याबाबतची नियमावली ठरविण्यात यावी, तिन्ही कंपनीमधील अभियंते व कर्मचाऱ्यांना लोकसेवकांचा दर्जा देण्यात यावा, अतिभारित उपविभाग व वितरण केंद्राचे विभाजन करण्यात यावे, प्रशासनाकडून अभियंत्यांवर होणारी एकतर्फी कार्यवाही करणे थांबवून सुदृढ वातावरणाची निर्मिती करण्यात यावी, बदली धोरणामध्ये सुधारणा व पारदर्शकता आणण्यात याव्या या मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या अभियंत्यांनी आंदोलन सुरू केले आहे. आज आंदोलनकर्त्यांनी दिवसभर बोरगाव (मेघे) येथील महावितरणच्या कार्यालयासमोर धरणे देत संबंधीतांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. या आंदोलनात एस.ई.ए.चे जयंत पैकीने, संजय पाटील, आकाश राजुरकर, सचिन सोनारकर, मंगेश ठाकरे, योगेश पांडे, अक्षय राजुरकर, प्रविण चांभारे, आलोक करंडे, हितेश मडापे, अतुल भैसारे, प्रथमेश बंगीनवार, भाऊसाहेब थुटे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.(शहर प्रतिनिधी) सामूहिक रजेचा इशारा ४गुरूवारपासून बोरगाव (मेघे) येथील महावितरणच्या कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी अभियंत्यांनी आंदोलन सुरू केले आहे. संबंधितांना निवेदन देण्यात आले असून मागण्यांचा समानुभूतीपूर्वक विचार न झाल्यास शुक्रवार ६ रोजी सर्व अभियंता सामूहिक रजेवर जाऊन शासनाच्या अधिकारी व कर्मचारी विरोधी धोरणांचा निषेध नोंदविणार असल्याचे यावेळी आंदोलकांकडून सांगण्यात आले.
एमएसईबीच्या अभियंत्यांचे धरणे
By admin | Published: January 06, 2017 1:21 AM