लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात नियमांना डावलून गोमांस व इतर पाळीव प्राण्याची कत्तल करून त्याचे मांस सर्रास विक्री होत असताना बनावटी अंडीही विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभाग कुंभकर्णी झोपेत तर नाही ना असा प्रश्न मोझरी (शेकापूर) येथील अनिल लंगडे यांनी उपस्थित केला आहे.प्राप्त माहितीनुसार, मोझरी (शेकापूर) येथील अनिल लंगडे यांनी दुकानातून सहा अंडी विकत आणली. त्यापैकी एक अंड त्यांनी उकळले असता टरफलाखालील भाग प्लॉस्टिकसारखा कडक आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर अनिल यांनी दुकानदाराला विचारणा केली असता त्याच्याकडूनही उडवा-उडवीचे उत्तर देण्यात आले. बनावटी अंडी असल्याचा प्राथमिक अंदाज आल्यावर अंड्याचे वरील आवरन जाळून बघितले. त्यानंतर ही अंडी बनावटी असल्याची खात्री त्यांना झाली. कुठल्याही परिस्थितीत भेसळयुक्त खाद्यपदार्थ वर्धा जिल्ह्यात विक्री होत नाही असा दावा करणाऱ्या अन्न व औषध प्रशासनाच्या दाव्याची पोलखोलच या प्रकारामुळे झाल्याची चर्चा मोझरी परिसरातील नागरिकांमध्ये सध्या रंगत आहे. अन्न व औषध प्रशासन याप्रकरणी काय कार्यवाही करते याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
बनावटी अंडी विक्री होत असल्याची कुठलीही तक्रार आमच्या विभागाला प्राप्त झालेली नाही. तक्रार प्राप्त होताच चौकशी करून कारवाई करण्यात येईल.- रविराज धाबर्डे, अन्न सुरक्षा अधिकारी, वर्धा.