वर्धा : रेल्वे प्रवासादरम्यानच महिलेचा प्रसुती कळा आल्याने वर्धा स्थानकावर पुणे- नागपूर एक्सप्रेस थांबविण्यात आली. दरम्यान रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी सतर्कता दाखवून तत्काळ रेल्वे रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावून महिलेची रेल्वे डब्ब्यातच नॉर्मल प्रसुती करण्यात आली असून महिलेने एका गोंडस मुलाला जन्म दिला.
प्राप्त माहितीनुसार, ११ रोजी सोमवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास रेल्वेगाडी क्रमांक १२१३५ पुणे-नागपूर ही रेल्वे वर्धा स्थानकावर आली. काही वेळातच रेल्वेगाडी स्थानकावरुन सुटली असता ‘चेन पुलींग’ झाल्याने रेल्वेगाडी पुन्हा स्थानकावर थांबविण्यात आली. रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी रेल्वेची पाहणी केली असता बोगी क्रमांक एस-१ ची पाहणी केली असता सीट क्रमांक ७-८ वर प्रवास करणाऱ्या रत्ना दयाल यादव (३०) रा. पारडी, नागपूर हिला प्रसुती कळा आल्याचे दिसले.
रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक रामसिंग मिना यांनी तत्काळ महिला कर्मचाऱ्यांना बोलावून स्टेशन मास्तरांना रेल्वेगाडी थांबविण्याच्या सूचना दिल्या. फलाटावर स्ट्रेचर तसेच हमलांना बोलावून रेल्वे रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलाविण्यात आले. बोगी रिकामी करुन पर्दे लावून महिला प्रधान आरक्षक कल्पना जाधव यांनी महिलेची नॉर्मल प्रसुती केली. यावेळी आर.एस. मीना यांच्या मार्गदर्शनात एस. के कनोजिया, मिश्रा, घोडेकर यांनी देखील सतर्कता बाळगली.
जवळपास एक तास चालले उपचार
पुणे-नागपूर रेल्वेगाडी वर्धा रेल्वेस्थानकावर सकाळी ७.५६ मिनिटांनी वर्धा रेल्वेस्थानकावर आली. पुढे ती नागपूरकडे जात असतानाच हा प्रकार घडल्याने जवळपास तासभर रेल्वे वर्धा रेल्वेस्थानकावर थांबविण्यात आली होती. प्रसुत महिलेला रुग्णालयात नेल्यानंतर रेल्वेगाडी ८.४२ मिनिटांनी वर्धा रेल्वेस्थानकावरुन पुढे नागपूरकडे जाण्यासाठी सोडण्यात आली.
प्रसुत महिला व नवजात बाळास पाठविले रुग्णालयात
रेल्वेगाडीत महिलेची सुरक्षित प्रसुती केल्यानंतर रेल्वे रुग्णालयातील परिचारिका पूजा भगत, स्वाती वासनिक यांनी प्रसुत महिलेच्या नातेवाईकांशी संपर्क करुन प्रसुत महिले व नवजात बाळाला जिल्हा सामान्य रुग्णालयात सुरक्षितरित्या उपचारार्थ दाखल केले.