आष्टी (श़) : ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाला संगणकीय प्रणालीद्वारे प्रमाणपत्र देण्याचे धोरण शासनाने राबविले़ त्यानुसार राज्यात ग्रामपंचायतमध्ये ई-संग्राम केंद्र स्थापन आहे़ या केंद्रांतून १८ प्रकारचे प्रमाणपत्र दिले जाते; पण यातून प्राप्त रकमेची पावती दिली जात नाही़ पैशाची नोंद ग्रा़पं़ च्या कुठल्याही खात्यात नाही़ यामुळे ई-संग्राम केंद्र सध्या वरकमाईचे साधन बनल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे़ई-संग्राम केंद्र ग्रा़पं़ च्या खोलीमध्ये सुरू करण्यात आले़ जिल्ह्यात १६५ ग्रा़पं़ कार्यालयात आजही वीज पुरवठा नाही़ त्यामुळे येथे भाड्याच्या विजेवर काम भागविणे सुरू आहे़ उर्वरित ग्रा़पं़ मध्ये असलेल्या वीज पुरवठ्यावर संगणक सुरू आहेत़ संगणकासाठी इंटरनेटची आवश्यकता आहे़ ग्रामीण भागात बीएसएनएल सेवेचा फज्जा उडाला असल्याने वेळेवर प्रमाणपत्र मिळत नाही़ दिवसभरात केव्हाही इंटरनेट सेवा सुरू होते़ त्यावेळी प्रमाणपत्रावर सही करण्यासाठी ग्रामसेवक मुख्यालयी राहत नाही़ नागरिक ग्रामसेवकांच्या मागे फिरून त्रस्त होतात़ अनेक ग्रामसेवक भ्रमणध्वनी बंद करून घरीच राहतात़ त्यांच्यावर गटविकास अधिकाऱ्यांचा वचक नाही़ एका महिन्यात १० ते १२ दिवसच ग्रामसेवक कर्तव्यावर येतात़ यामुळे ई-संग्राम केंद्राच्या सुविधा वेळेवर मिळत नाही़ ई-संग्राम केंद्रातून दिल्या जाणाऱ्या प्रिंटेड कागदाचा दर्जा जे सिरीज असायला पाहिजे; पण या कागदांवर जिल्ह्यात कुठेही प्रमाणपत्र मिळत नाही़ साध्या कागदावर प्रमाणपत्र देऊन बोळवण केली जाते़ यासाठी प्रती दाखला २५ रुपये घेतले जातात़ नागरिकांनी पैसे दिल्यानंतर पावती दिली जात नाही़ हा पैसा कुठल्या उत्पन्नात जमा होतो, हे कळण्यास मार्ग नाही़ ग्रा़पं़ने किती लोकांना दाखले दिले, याचीही नोंद नाही़ या अनागोंदी कारभाराची जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी चौकशी करून संबंधित ग्रामसेवकांना निलंबित करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे़ शासनाच्या योजना चांगल्या आहेत; पण त्या राबविणारी यंत्रणा कुचकामी आहे़ यामुळे योजनांची वाट लागत आहे़ अस्तित्वात असणाऱ्या योजनांची वरचेवर तपासणी करण्यास येणारे पथक हात ओले करून परत जातात़ यामुळे जिल्ह्यातील सर्व ई-संग्राम केंद्राची त्वरित तपासणी करून कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे़(प्रतिनिधी)
ई-संग्राम केंद्र झाले वरकमाईचे साधन
By admin | Published: June 30, 2014 12:03 AM