लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारत बांधकामासंदर्भातील फाईलचा प्रवास अनेक वर्षांपासून सुरु होता. अखेर हा प्रवास थांबला असून पर्यावरणपूरक इमारत निर्मितीकरीता तांत्रिक मंजूरी मिळाली आहे. त्यामुळे येत्या २ आॅक्टोबर गांधी जयंती दिनी पर्यावरणपूरक जिल्हाधिकारी कार्यालय व नियोजन भवनाचा भूमीपूजन सोहळा संपन्न होणार आहे.जिल्ह्याचा कारभार हा स्वातंत्र्यपूर्व काळातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीतूनच सुरु आहे. ही इमारत जीर्ण झाल्याने कर्मचाऱ्यांना काम करतांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. बरेचदा छताचा काही भाग खाली पडल्याच्याही घटना घडल्या. सध्या कार्यालयातील काही भिंतीवर झाडेही उगवलेली आहे. छतही पुर्णत: निकामी झाल्याने पावसाळ्यात ताडपत्रीचाच आधार घ्यावा लागत होता. त्यामुळे नवीन इमारतीच्या बांधकामकरिता वारंवार फाईलने मंत्रालयाचे दार ठोठावले. परंतू तांत्रिक अडणींमुळे फाईलचे अप-डाऊनही सुरुच राहिले. अखेर यावर्षी जिल्हाधिकारी कार्यालय व नियोजन भवनाच्या कामाला हिरवी झेंडी मिळाली. सध्या असलेले जिल्हाधिकारी कार्यालय व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाची इमारत पाडून जवळपास १ लाख १० हजार ६३० चौरस मीटर क्षेत्रात या भव्य इमारतीचे बांधकाम होणार आहे. विशेषत: ही इमारत पर्यावरणपूरक व वाताणुकूलीत राहणार आहे. ही इमारत राज्यातील एकमेव इमारत असल्याचे सांगण्यात येत असल्याचे सांगण्यात येत असल्याने या भव्यदिव्य इमारतीमुळे वर्ध्याच्या सौदर्यिकरणात आणखीच भर पडणार आहे.दोन मजली इमारतीत राहणार सर्वच कार्यालयजिल्हाधिकारी कार्यालय व नियोजन भवनाची इमारत ही तळमजला, पहिला व दुसरा मजला अशा स्वरुपात राहणार आहे.जिल्हाधिकारी कार्यालयाकरिता शासनाकडून २५ कोटी ४६ लाखाचा निधी मंजूर झाला असून त्यापैकी २० कोटी २१ लाख रुपयाच्या निधीला तांत्रिक मंजूरी मिळाली आहे. तसेच नियोजन भवनाकरिता जिल्हा नियोजन समितीतून १७ कोटी ६५ लाख ८ हजार रुपयाच्या निधीला मंजूरी दिली. यापैकी ८ कोटी ७५ लाख २४ हजार रुपयाचा निधीला तांत्रिक मंजूरी मिळाली आहे. या दोन्ही कार्यालयाकरिता एकूण २९ कोटीच्या निधीला तांत्रिक मंजूरी दिली असून यातून केवळ बांधकाम करण्यात येणार आहे. तर उर्वरीत निधी इतर कामांसाठी दिल्या जाणार आहे. या इमारतीत जिल्हाधिकारी कार्यालयाशी निगडीत असलेल्या सर्व विभागाचे कार्यालय एकाच ठिकाणी राहणार असल्याने ही इमारत युनिक ठरणार आहे.महसूल विभाग एकाच छताखालीउपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालय सध्या वेगवेगळ्या इमारतीत होते. परंतु आता जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील जुन्या तहसील कार्यालयाच्या जागेवर दोन मजली इमारत उभारण्यात आली आहे. या इमारतीचे लोकार्पण गांधीजयंती दिनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय आणि उपविभागीय कार्यालय या तिनही कार्यालयाचे कामकाज आता एकाच इमारतीतून चालणार आहे. त्यामुळे नागरिकांसह अधिकारी व कर्मचाºयांनाही हे सोयीचे ठरणार आहे.इमारतीची काही वैशिष्ट्येही इमारत जवळपास १ लाख १० हजार ६३० चौरस मीटरमध्ये साकारण्यात येणार आहे. या इमारतीची लांबी जवळपास १४० मीटर तर रुंदी ५८ मीटर राहणार आहे. या इमारतीमध्ये दुपारीा लाईट लावण्याची आवश्यकता भासू नये म्हणून सौर प्रकाशावर भर दिली जाणार आहे. तसेच आतमध्ये राजमुद्रा, लोटस यांची प्रतिकृतीसह कार्यालयासमोर गांधी विचारांवर आधारीत बगीचाही साकारण्यात येणार आहे. याकरिता जीआरआयएचए या संस्थेशी करार करण्यात आला आहे. तसेच या इमारतीचा कंत्राट नागपूरच्या कंत्राटदाराला देण्यात आला असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले आहे.गांधी जयंतीला नवीन जिल्हाधिकारी कार्यालय नियोजनभवनाचे भूमीपूजन तर तहसील व उपविभागीय कार्यालयाच्या नवीन इमारतीचे लोकार्पण होईल. गांधी जयंतीपासून तिन्ही कार्यालयाचे कामकाज या एकाच इमारतीतून चालणार आहे. दोन कार्यालयातील साहित्य हलविण्यात आले असून जिल्हाधिकारी कार्यालयातील साहित्य हलविण्याकरिता एक आठवडातरी लागेल.-शैलेश नवाल, जिल्हाधिकारी.
वर्ध्यात पर्यावरणपूरक जिल्हाधिकारी कार्यालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 11:40 PM
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारत बांधकामासंदर्भातील फाईलचा प्रवास अनेक वर्षांपासून सुरु होता. अखेर हा प्रवास थांबला असून पर्यावरणपूरक इमारत निर्मितीकरीता तांत्रिक मंजूरी मिळाली आहे.
ठळक मुद्देनवनिर्मिती : गांधी जयंती दिनी होणार जिल्हाधिकारी कार्यालय व नियोजन भवनाचे भूमीपूजन