युद्धाचा भडका; फोडणी महागली, खाद्यतेलांच्या किमतीत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2022 12:10 PM2022-03-10T12:10:38+5:302022-03-10T12:12:42+5:30
वाढत्या खाद्यतेलाच्या दरामुळे सर्वसामान्यांची फोडणी महागली आहे.
वर्धा : रशिया-युक्रेन युद्धाचे पडसाद संपूर्ण जगावर उमटले आहेत. जागतिक पातळीवर वाढलेल्या तणावामुळे कच्चा तेलाच्या किमती वाढल्या आहेत. १५ किलो खाद्यतेलाच्या डब्यामागे केवळ एक दिवसात २४० ते २८० रुपये वाढ झाली. त्यामुळे सर्वसामान्यांना वाढत्या तेलदराचा चटका सोसावा लागणार आहे. मागील काही दिवसांपासून खाद्यतेलाचे दर स्थिर होते. मात्र, या युद्धामुळे तेलाच्या किमती पुन्हा भडकल्याचे दिसत आहे. तेलाची आयात रशियातून होते. युद्धामुळे आयातच थांबल्याने तेल विक्रेतेही अडचणीत सापडले आहेत.
दरम्यान, वाढत्या खाद्यतेलाच्या दरामुळे सर्वसामान्यांची फोडणी महागली आहे. भारतात दरवर्षी जवळपास २२० लाख ते २४० लाख टन तेलाचा उपयोग करण्यात येतो. एकूण लागणाऱ्या तेलापैकी ६० ते ७० टक्के खाद्यतेलाची आयात करावी लागते. सूर्यफूल आयात करण्याचे प्रमाण अधिक आहे. युद्धाच्या परिणामस्वरूप तेलाचे दर १५ ते २५ रुपयांनी वाढले आहेत. दक्षिण अमेरिका खंडात सोयाबीनचे उत्पादन घटले आहे. याचा परिणाम सोयाबीन तेलावर झाला आहे.
असे वाढले तेलघाण्यावरील खाद्यतेलाचे दर (किलो)
प्रकार २४ फेब्रुवारीपूर्वी ७ मार्चला
सोयाबीन १५६ १७४
फल्ली १७८ १८८
जवस २२० २२०
खोबरा २८० २९०
साठेबाजीत झाली वाढ...
युद्धाचा फायदा घेत काही व्यावसायिकांनी खाद्यतेलाची साठेबाजी करून ठेवली असल्याने तेलाचे दर वाढले आहेत. किराणा व्यावसायिकांकडून सोयाबीन तेल १८० रुपये किलो, फल्ली तेल १९० रुपये किलो तर जवस तेल २२० रुपये किलोने विक्री केले जात असल्याचे दिसून येत आहे.