वसंत आंबटकर नवे सभापती : काँग्रेसचे ५ व राकाँचे सर्व ८ सदस्य गैरहजरवर्धा : जिल्हा परिषदेच्या शिक्षण व आरोग्य समिती सभापती पदाची निवडणूक बुधवारी शांततेत पार पडली. भाजपला सभापती पद कायम ठेवण्यात यश मिळाले. भाजप आणि काँग्रेसमध्ये झालेल्या सरळ निवडणुकीत भाजपचे वडनेरचे जि.प. सदस्य वसंत आंबटकर यांनी काँग्रेसचे विरुळ येथील जि. प. सदस्य गजानन गावंडे यांच्यावर १२ मताधिक्याने विजय संपादन केल्याने त्यांच्या गळ्यात सभापती पदाची माळ पडली. आंबटकर यांना २५ मते मिळाली, तर गावंडे यांना काँग्रेस व राकाँच्या काही सदस्यांच्या गैरहजेरीमुळे केवळ १३ मतांवर समाधान मानावे लागले. सभागृहात भाजप १९, मेघे गट समर्थित ४ अपक्ष आणि शेतकरी संघटनेचे दोन असे एकूण २५ सदस्य सत्ताधारी गटाकडून हजर होते, तर काँग्रेसकडून काँग्रेस ११, शेतकरी संघटना १ व अपक्ष १ असे एकूण १३ सदस्य सभागृहात हजर होते. या निवडणूक प्रक्रियेला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व ८ आणि काँग्रेसचे ५ सदस्य गैरहजर होते. या सदस्यांच्या गैरहजेरीने भाजप उमेदवाराला अप्रत्यक्षपणे मदतच झाली. हे सर्व सदस्य भाजपच्या खेम्यात गेल्याची विश्वसनीय माहिती आहे. पडद्यामागून घडलेल्या या नाट्यमय घडामोडींमुळे भविष्यात जिल्ह्यात नवी राजकीय उलथापालथ होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होताच सत्ताधारी भाजपतर्फे वसंत आंबटकर, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतर्फे गजानन गावंडे, तर शेतकरी संघटनेतर्फे गजानन निकम यांनी सभापती पदासाठी आपले नामांकन दाखल केले. विलास कांबळे व राणा रणनवरे हे आंबटकर यांचे, संजय कामनापुरे हे गजानन गावंडे यांचे, तर नंदकिशोर कंगाले हे गजानन निकम यांचे सूचक होते. नंतर निकम यांनी आपले नामांकन परत घेतल्यामुळे आंबटकर आणि गावंडे यांच्यात सरळ निवडणूक झाली. अध्यासी अधिकाऱ्यांनी हात उंचावून आपली मते नोंदविण्याची सूचना सदस्यांना केली. यामध्ये आंबटकर यांनी २५ मते घेत विजय संपादन केला, तर गावंडे यांना १३ मते घेत पराभवाचा सामना करावा लागला. अध्यासी अधिकारी म्हणून अपर जिल्हाधिकारी दीपक नलावडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विवेक इलमे, सहाय्यक अध्यासी अधिकारी म्हणून हिंगणघाटचे उपविभागीय अधिकारी घनश्याम भुगावकर, अव्वल कारकून हेमा वाघ यांनी ही प्रक्रिया हाताळली. आंबटकर यांना विजयी घोषित करताच जि.प. अध्यक्ष चित्रा रणनवरे आणि उपाध्यक्ष विलास कांबळे यांनी पुष्पहाराने त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी भाजपाचे विदर्भ संघटक उपेंद्र कोठेकर, सुधीर दिवे, जिल्हाध्यक्ष राजू बकाने, माजी जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे, माजी खासदार विजय मुडे यावेळी आवर्जून उपस्थित झाले. सभापतिपद कायम ठेवण्यासाठी खा. रामदास तडस, बकाने, दिवे यांनी, तर पडद्यामागून माजी खासदार दत्ता मेघे यांनी सूत्रे हलविली. जि.प. उपाध्यक्ष विलास कांबळे, जि.प. सदस्य राणा रणनवरे यांनी प्रत्यक्ष धडपड केल्याची माहिती आहे.(जिल्हा प्रतिनिधी) सूचक असूनही राष्ट्रवादीचे संजय कामनापुरे गैरहजरसभापती पदाची निवड प्रक्रिया शांततेत पार पडली असली तरी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत मोठी फूट पडल्याचे उघड झाले आहे. आघाडीतर्फे गजानन गावंडे यांच्या नामांकन अर्जावर सूचक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे जि.प. सदस्य संजय कामनापुरे यांनी स्वाक्षरी केली होती. मात्र प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी राष्ट्रवादीच्या सदस्यांसमवेत तेसुद्धा सभागृहात गैरहजर होते. हा काँग्रेसला राष्ट्रवादीचा हादरा असल्याचे बोलले जात आहे. गैरहजर असलेले राष्ट्रवादीचे आठ आणि काँग्रेसचे पाच सदस्य भाजपच्या खेम्यात गेल्याची चर्चा यावेळी सुरु होती. यामुळे सभागृहात काँग्रेस एकाकी पडण्याची चिन्हे आहेत.
शिक्षण सभापतिपद भाजपकडेच
By admin | Published: April 07, 2016 2:06 AM