वर्धा : पंक्चर दुरुस्ती करीत असताना अचानक मागाहून भरधाव आलेल्या आयशर वाहनाने कारला जबर धडक दिल्याने कारमधील नववधू आणि तिच्यासोबत बसून असलेली एक महिला गंभीररित्या जखमी झाली. हा अपघात आजदा शिवारात २३ रोजी सोमवारी पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास नागपूर ते हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर झाला.
अश्विनी ओजवाल (२८) काजल पोट्टवार (२५) दोन्ही रा. वणी जि. यवतमाळ असे गंभीर झालेल्यांची नावे असून त्यांच्यावर नागपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
वणी येथील रहिवासी अश्विनी ओजवाल हिचा विवाह झाल्याने ती वराच्या कारने (एम.एच. १४ जे.एम. ७९०१) नागपूरच्या दिशेने जात होत्या. दरम्यान कारचा टायर पंक्चर झाल्याने कारमधील चालकासह वराकडील मंडळी कारखाली उतरली. मात्र, नववधू अश्विनी ओजवाल आणि तिची मैत्रिण काजल पोट्टवार या दोघी कारमध्येच बसून होत्या. टायर पंक्चर दुरुस्ती करीत असतानाच मागाहून भरधाव येणाऱ्या आयशर (टीएस. २६ टी. ९६३१) वाहनाने जबर धडक दिली. धडकेत कारचा चेंदामेंदा झाला.
अपघाताची माहिती मिळताच जामा पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष सपाटे, पोलीस उपनिरीक्षक दिलीप थाटे, एएसआय भगत, पिसुड्डे, विनोद थाटे, किशोर लभाने, नागेश तिवारी, राहूल हुमरे यांनी अपघातस्थळी धाव घेत जखमींना रुग्णवाहिकेतून नागपूर येथील खासगी रुग्णालयात उपचारार्थ पाठाविले. कारखाली उतरलेली वराकडील मंडळी मात्र थोडक्यात बचावली.
अपघातात आयशर वाहन आणि कारचा चेंदामेंदा झाल्याने काही वेळ दोन्ही बाजूची वाहतूक खोळंबली होती. पोलिसांनी दोन्ही अपघातग्रस्त वाहनांना हायड्राच्या सहाय्याने रस्त्याच्या बाजूला करुन वाहतूक सुरळीत केली. अपघाताची माहिती समुद्रपूर पोलिसांना देण्यात आली. पुढील तपास समुद्रपूर पोलीस करीत आहे. वृत्तलिहेस्तोवर वराचे नाव तसेच इतरांची नावे कळू शकली नाही.