आनंद इंगोलेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्हा परिषदेच्या शाळांमधील गळतीचे प्रमाण रोखण्याकरिता इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या तुलनेत याही शाळा आदर्श बनविण्याकरिता शासनाने पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यातील आठही तालुक्यांतील प्रत्येकी एक शाळा निवडून आठ शाळा आदर्श बनविण्याचा निर्णय घेतला. त्याकरिता कोट्यवधीचा निधीही उपलब्ध करून देण्यात आला. पण, गेल्या एक ते दीड वर्षापासून या आदर्श शाळेतील बांधकामाला सुरुवात झाली नसल्याने शिक्षण विभाग हा मुहूर्त कधी साधणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सर्वांगीण भौतिक व शैक्षणिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देत शाळांसह विद्यार्थ्यांचीही गुणवत्ता वाढविण्याकरिता ‘आदर्श शाळा’ हा उपक्रम शासनाने हाती घेतला. प्रत्येक तालुक्यातील एक शाळा शासनस्तरावर निवडण्यात आली. यामध्ये वर्धा जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील आठ शाळांची निवड करण्यात आली. या शाळांच्या विकासाकरिता दोन टप्प्यांत निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात छोटी बांधकामे, दुरुस्ती व सौंदर्यीकरणाची कामे करण्यासाठी जिल्ह्याला २ कोटी ११ लाख ६७ हजारांचा निधी प्राप्त झाला आहे. यासोबतच मोठ्या बांधकामाकरिता आणि सर्वा सोयी-सुविधांची पूर्तता करण्याकरिता एका शाळेला जवळपास १ कोटी रुपये मिळणार आहेत. त्यापैकी २ कोटी ५२ लाखांचा निधी शिक्षण विभागाला प्राप्त झाला आहे. परंतु आदर्श शाळा निश्चित होऊन आता साधारणत: एक ते दीड वर्षाचा कालावधी लोटल्यावरही अजून कामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे या आठ शाळांचे रूपडे कधी पालटणार आणि गुणवत्ता कधी सुधारणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
आदर्श शाळेत काय सुविधा राहणार?या शाळेतील इमारत, वर्गखोली आणि सुरक्षा भिंतीचे बांधकाम केले जाणार आहे. यासोबतच मुलं-मुली आणि दिव्यांगांकरिता स्वच्छतागृह, शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय, किचन शेड, खेळणीची उपलब्धता, ग्रंथालय, संगणक कक्ष, हात धुण्याचे केंद्र, विद्युतीकरण आणि सौंदर्यीकरणावर भर दिला जाणार आहे.
जिल्ह्यातील आठही तालुक्यांतील प्रत्येकी एक शाळा आदर्श करण्यासाठी निधी मंजूर केला आहे. जिल्ह्याला लहान बांधकामाकरिता २ कोटी ११ लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. बांधकाम विभागाने या कामांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या असून लवकरच कार्यारंभ आदेश देऊन कामाला सुरुवात होईल. त्यानंतर लवकरच मोठ्या कामांचीही निविदा प्रक्रिया पूर्ण केली जाईल.- लिंबाजी सोनवणे, शिक्षणाधिकारी प्राथमिक.
लहान बांधकामाच्या निविदा झाल्या - जिल्हा परिषदेच्या आठ शाळा आदर्श करण्याकरिता लहान बांधकामे आणि मोठी बांधकामे अशा दोन टप्प्यांत निधी मंजूर करण्यात आला आहे. आठही शाळांमध्ये लहान बांधकामाकरिता २ कोटी ११ लाख ७६ हजारांचा निधी प्राप्त झाला आहे. तर मोठ्या बांधकामाकरिता सरासरी प्रत्येक शाळेला १ कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी २ कोटी ५२ लाख प्राप्त झाले आहे, परंतु आता केवळ लहान बांधकामाचीच निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मोठ्या कामांच्या निविदांचा अजून पत्ता नाही.