लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : येथील सामान्य रुग्णालयात उपरार्थ दाखल करण्यात आलेल्या वृद्धावर थातुरमातूर उपचार करुन घरी परतवून लावले. रुग्णास दाखल करुन घेण्याची विनंती केल्यानंतरही कार्यरत असलेल्या महिला वैद्यकीय अधिकाऱ्यानी घरचा रस्ता दाखविला. घरी पोहोचताच वृद्धाचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी रुग्णालय गाठून वैद्यकीय अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी केली आहे. मारोतराव भुजाडे (७५) रा. पुलफैल, वर्धा असे मृत वृद्धाचे नाव आहे. त्यांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ते पुलफैल परिसरातील पुलाखाली पडून होते. त्याच परिसरात राहणारे नासिर खान अकबर खान पठाण यांना ते ओळखीचे दिसल्याने त्यांनी लगेच ऑटो बोलावून बुधवारी दुपारी २ वाजतादरम्यान त्यांना सामान्य रुग्णालयात दाखल केले. याची माहिती भुजाडे यांच्या परिवारालाही दिली. नातेवाईकही लागलीच रुग्णालयात आले. तेव्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. रश्मी गोडे कार्यरत होत्या. त्यांनी रुग्णाची पूर्ण तपासणी न करता हाताच्या बोटाला तात्पुरती पट्टी बांधून तीन इंजेक्शन दिले. त्यानंतर लगेच घरी घेऊन जाण्यास सांगितले. रुग्णाची प्रकृती पाहून दाखल करुन घेण्याची विनंती केली; पण रुग्णासह नातेवाईकांना बाहेरचा मार्ग दाखविला. त्यामुळे नाईलाजाने ते वृद्ध रुग्णाला घरी घेऊन गेले. काही वेळातच वृद्धाचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी मृतासह रुग्णालय गाठून वैद्यकीय अधिकारी डॉ. गोडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.रुग्णालयात आल्यावर वैद्यकीय अधिकारी नसल्याने चांगलेच तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नातेवाईकांनी डॉ. गोडे यांना बोलाविण्याची मागणी लावून धरली. यादरम्यान जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक अनिल वानखेडे यांनी येऊन मृताची पाहणी केली. तसेच शवविच्छेदनानंतर आलेल्या अहवालांती कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिले. यासंदर्भात मृताचे नातेवाईक ज्योती प्रकाश मस्के, दिव्या प्रकाश मस्के यांनी पोलिसातही तक्रार दिली आहे.
वृद्धाचा रुग्णालयाच्या बाहेर मृत्यू झाला असून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आवश्यक ते उपचार त्यांच्यावर केलेत. यात नातेवाईकांचा काही तरी गैरसमज झाला असून शवविच्छेदनानंतर सर्व स्पष्ट होईल.- डॉ. सचिन तडस, जिल्हा शल्य चिकित्सक.