देवळीत बाजार समितीची निवडणूक; काँग्रेस-राष्ट्रवादीत युतीची खलबते, भाजपचे तळ्यात-मळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2023 12:35 PM2023-03-29T12:35:49+5:302023-03-29T12:36:35+5:30
राजकीय ज्वर वाढला : युतीच्या चर्चेसोबतच जागा वाटपासाठी बैठकांना उधाण
हरिदास ढोक
देवळी (वर्धा) : तब्बल दीड वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला. त्यामुळे देवळी तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. बाजार समितीवर वर्चस्व कायम ठेवण्याकरिता काँग्रेसचे आमदार रणजित कांबळे तसेच राष्ट्रवादीचे नेते प्रा. सुरेश देशमुख यांच्या गटात युतीकरिता खलबते सुरू झाली आहेत. महाविकास आघाडीच्या तत्त्वानुसार या निवडणुका लढण्याचे आदेश असल्याने दोन्ही गटाकडून जागा वाटपाचे समीकरण मांडले जात आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीतील सेवा सहकारी, ग्रामपंचायत, व्यापारी, अडते तसेच हमाल, मापारी गटातील मतदारांत कॉंंग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची बाजू भक्कम आहे. शिवाय खासदार रामदास तडस यांच्याकडून भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यादरम्यानच्या युतीची शक्यता तपासली जात आहे. प्रा. सुरेश देशमुख यांच्या सोबतच्या बैठकीत युतीची समिकरणे मांडून चर्चेला वाव दिला जात आहे. यासोबतच अशी युती न झाल्यास भाजपला काही जागा देण्याबाबतची बाजू तपासली जात आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजपचे सध्या तळ्यात- मळ्यात असल्याचे दिसून येत आहे.
पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून येत्या ३ एप्रिलपासून नामनिर्देशनपत्र भरण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीच्या विरोधात भाजपने दंड थोपटून उभे राहिल्यास रंगत येणार आहे. भाजपचे ग्रामपंचायत गटात बऱ्यापैकी मताधिक्य असल्याने कार्यकर्त्यांचा आग्रह असल्याचे बोलले जात आहे.
बाजार समितीच्या १८ संचालकांकरिता निवडणूक
या निवडणुकीत सेवा सहकारी ११, ग्रामपंचायत चार, व्यापारी अडते दाेन, तसेच हमाल मापारी मतदारसंघातील एक अशा एकूण १८ जागेसाठी मतदान होत आहे. देवळी तालुक्यात ४१ सेवा सहकारी संस्था कार्यरत असून या संस्थेतील ५३२ मतदार सेवा सहकारी गटात मतदानाचा हक्क बजावणार आहे. या गटातील ११ जागांपैकी सात जागा सर्वसाधारण, दाेन महिला, एक इतर मागासवर्गीय तसेच एक जागा विमुक्त भटक्या जमातीसाठी आरक्षित ठेवण्यात आली आहे. तसेच ग्रामपंचायत गटातील चार जागांसाठी तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतीमधील ५५७ मतदार हक्क बजाविणार आहे.
या गटातील चार जागांपैकी दाेन जागा सर्वसाधारण, एक अनुसूचित जाती- जमाती तसेच एक जागा आर्थिक दुर्बल घटकासाठी आरक्षित ठेवण्यात आली आहे. व्यापारी अडते मतदार गटातील दाेन जागांसाठी ९७ मतदार तसेच हमाल मापारी मतदार गटातील एक जागेसाठी ५५ मतदार हक्क बजाविणार आहेत.