प्रशांत हेलोंडे - वर्धाविधानसभा निवडणुका अवघ्या १७ दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत़ १५ आॅक्टोबर रोजी मतदान होऊ घातले असून ३ सप्टेंबर पर्यंत नवरात्रोत्सवाची धामधूम राहणार आहे़ आता प्रचाराची रणधुमाळी व नवरात्रोत्सवाची धूम यात कुठेही गफलत होऊ नये, अनैतिक प्रकारांना चालना मिळू नये, जिल्ह्यात काळा पैसा येऊ नये, हॉटेलांमध्ये अनधिकृतरित्या बैठका वा पैशांच्या वाटाघाटी होऊ नयेत यावर ‘पोलीस वॉच’ राहणार आहे़ यासाठी पोलिसांचा बंदोबस्त कमालीचा वाढविण्यात आला असून हॉटेल, लॉजची तपासणी मोहीमही हाती घेण्यात आली आहे़ नवरात्रोत्सव आणि विधानसभा निवडणुका एकत्रच आल्याने पोलीस यंत्रणेसह निवडणूक विभाग आणि अन्य शासकीय कर्मचाऱ्यांचीही दमछाक होत असल्याचे एकूण चित्र आहे़जिल्ह्यातील हिंगणघाट आणि वर्धा शहरामध्ये नवरात्रोत्सव मोठ्या भक्तीभावाने आणि उत्साहात तसेच मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो़ या नऊ दिवसांमध्ये विविध धार्मिक, सामाजिक कार्यक्रम, उपक्रमांचे आयोजन दूर्गोत्सव मंडळांद्वारे केले जाते़ शिवाय सर्व दिवस शहरात सर्वत्र लंगर, चहा, ज्यूस, दूध, फराळ वितरणाचे कार्यक्रमही घेतले जातात़ यासाठी लागणारी परवानगी घेऊन सर्व मंडळे अन्नदानामध्ये पुढाकार घेतात़ या सर्व उपक्रम, कार्यक्रमांवर नजर ठेवण्याचे कर्तव्य पोलीस यंत्रणेला पार पाडावे लागते़ यासाठी वर्धा शहरात पोलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे़ चौका-चौकात पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले असून प्रत्येक हालचालींवर ते लक्ष ठेवून आहेत़ कुठे काही गैरप्रकार तर होत नाही ना, यावरही पोलिसांचा वॉच आहे़शिवाय पोलीस यंत्रणेद्वारे जिल्ह्यात सर्वत्र दारूविक्रेत्यांवरील धाडसत्रातही वाढ करण्यात आली आहे़ निवडणुका जाहीर झाल्यापासून आजपर्यंत मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी दारूसाठा व मुद्देमाल जप्त करण्यात आला असून गावठी दारूभट्ट्याही उद्ध्वस्त करण्यात आल्या आहेत़ सोळा दिवसांमध्ये सुमारे पाच लाखांवर दारूसाठा व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़ यामुळे दारूविक्रेत्यांचेही धाबे दणाणले आहे; पण शहरातील दारूचा महापूर थांबताना दिसत नाही़ पोलिसांनी कितीही साठा पकडला तरी दारूविक्रीचे सातत्य कायम असल्याचेच चित्र आहे़ सध्या नवरात्रोत्सव असल्याने अनेक नागरिक दारूपासून अलिप्त असतात़ एवढाच काय तो लाभ पोलीस यंत्रणेला होत असल्याचे सध्याचे चित्र आहे़ प्रत्येक विधानसभा मतदार संघात येणाऱ्या काळ्या पैशावर पोलीस, अधिकारी व कर्मचाऱ्यांची करडी नजर आहे़ यासाठी प्रत्येक मतदार संघाच्या सिमेवर वाहनांची तपासणी केली जात आहे़ वर्धा जिल्ह्यात केवळ समुद्रपूर तालुक्यात वाहनामध्ये रक्कम आढळून आली; पण अन्यत्र अद्याप अशा घटना घडलेल्या नाहीत़ आचार संहितेचा भंग होऊ नये, ही जबाबदारी असल्याने डोळ्यात तेल घालून वॉच ठेवला जात असल्याचे दिसते़ यासाठी विविध पथके तैनात करण्यात आली असून पोलिसांची पेट्रोलिंगही वाढविण्यात आली आहे़
निवडणूक व नवरात्रीवर पोलिसांचा ‘वॉच’
By admin | Published: September 29, 2014 11:11 PM