वर्धा : पुलगाव नजीकच्या नाचणगाव येथील बाजार चौकात लपाछपीचा खेळ खेळत असताना दोघा चिमुकल्यांचा विद्युत प्रवाहित हायमास्टला स्पर्श झाला. यात एका चिमुकल्याचा मृत्यू झाला असून एकावर सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अंश धनराज कोडापे (७) असे गतप्राण झालेल्या तर आलोक विलास राऊत (७) असे उपचार सुरू असलेल्या चिमुकल्याचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी उशीरा नाचणगाव येथील बाजार चौकात अंश व आलोक हे लपाछपीचा खेळ खेळत होते. अशातच अंश आणि आलोक यांचा याच भागात असलेल्या विद्युत प्रवाहित हायमास्टला स्पर्श झाल्याने त्यांना विद्युत प्रवाहाचा जबर झटका बसला.
ही घटना परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत अंश व आलोक यांना तातडीने पुलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे तपासणीअंती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अंश याला मृत घोषित केले. तर आलोकची प्रकृती नाजूक असल्याने त्याला तातडीने सेवाग्राम येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. ज्या ठिकाणी सदर घटना घडली तेथून ग्रामपंचायत कार्यालय हाकेच्या अंतरावर आहे. गावातील परिस्थिती पाहता आज मंगळवारी ग्रामपंचायत कार्यालय कुलूपबंद होते.
ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्षच
सदर हायमास्टच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी नाचणगाव ग्रामपंचायत प्रशासनाची आहे. या धोकादायक ठरणाऱ्या हायमास्टबाबत ग्रामपंचायत प्रशासनाला यापूर्वीच सांगण्यात आले होते. परंतु, खबरदारीच्या उपाय योजना करण्याकडे दुर्लक्ष करण्यातच धन्यता मानण्यात आली, अशी चर्चा सध्या पुलगाव आणि नाचणगावात होत आहे.
अंश एकुलता एक
अंश हा धनराज कोडापे यांचा एकुलता एक मुलगा होता. तो नेहमीच बाजार चौकात हसत-खेळत दिसायचा. त्याच्या अपघातीमृत्यूमुळे कोडापे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगरच कोसळला आहे.
अन्यथा घडली असती मोठी घटना
सध्या शारदीय नवरात्रोत्सव साजरा केला जात आहे. नाचणगाव येथील बाजार चौकात सदर हायमास्ट शेजारीच देवीचे मंदिर असून तेथे नवरात्रोत्सवात भाविकांचा मळाच फुलतो. पण घटनेच्या दिवशी येथे तुरळक गर्दी होती. घटनेच्यावेळी या ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी राहिली असती तर विद्युत प्रवाहित हायमास्टने अनेकांचेच प्राण घेतले असते, अशी चर्चा सध्या परिसरात हाेत आहे.
पोलीस स्टेशनसमोर दिला ठिय्या
मृताच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात यावी तसेच गंभीर जखमीच्या उपचारासाठी शासकीय मदत द्यावी, या मागणीसाठी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रशांत शहागडकर, राजू लोहकरे तसेच संतप्त ग्रामस्थांनी पुलगाव पोलीस स्टेशनसमोर ठिय्या आंदोलन केले. या प्रकरणी ग्रामपंचायत प्रशासनासोबत चर्चा करू, असे आश्वासन ठाणेदार शैलेश शेळके यांनी दिल्याने आंदोलनकर्त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले.