अप्रेंटीस असोसिएशन : निवेदनातून महावितरणला साकडे वर्धा : महावितरण, महापारेषण व महानिमितीमध्ये अनेक शिकाऊ उमेदवार व कंत्राटी कामगार कार्यरत आहेत. त्यांना वीज कंपनीने संधी देत कायम करावे, अशी मागणी अप्रेंटीस असोसिएशनद्वारे करण्यात आली. विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनच्या अप्रेंटीस असोसिएशनद्वारे महावितरण, महापारेषण, महानिर्मिती कंपनीमध्ये शिकाऊ उमेदवारी पूर्ण केलेल्या शिकाऊ उमेदवार व कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांवर लक्ष वेण्याकरिता निवेदन देण्यात आले. महावितरण कंपनीमधील विद्युत सहायक भरती प्रक्रियेतील प्रतिक्षा यादी लावण्यात यावी. महावितरण, महानिर्मिती, महापारेषण कंपनीमध्ये शिकाऊ उमेदवारी पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींकरिता १० टक्के पदे राखीव असतात; पण संधी दिली जात नाही. शिकाऊ उमेदवारी पूर्ण झालेल्या उमेदवारांना त्यांचा अनुभव लक्षात घेऊन कायम करणे गरजेचे आहे. महावितरण, महानिर्मिती कंपनीमध्ये शिकाऊ उमेदवारी पूर्ण केलेल्या उमेदवारांना ८० टक्के जागा कंपनीमध्ये भेदभाव न ठेवता राखीव ठेवण्यात याव्या. बाह्य स्त्रोत, कंत्राटी कामगारांना प्राधान्याने सामावून घ्यावे. महापारेषण कंपनीमध्ये तृतीय व चतुर्थ श्रेणी सरळ सेवा भरतीमध्ये तारतंत्री उमेदवारांना संधी देण्यात यावी आदी मागण्या अप्रेंटीस असोसिएशनने लावून धरल्या आहेत. या मागण्यांसाठी अनेकदा शासन व प्रशासन दरबारी आंदोलन केले. निवेदनाद्वारे समस्या मांडल्या. १४ जून २०१६ रोजी अकोला येथे राजस्तरीय धरणे आंदोलन करून हजारो शिकाऊ उमेदवार व कंत्राटी कामगारांनी प्रशासनाचा निषेधही नोंदविला; पण अद्यापही प्रश्न निकाली निघाला नाही. परिणामी, शिकाऊ उमेदवार व कंत्राटी कामगारांमध्ये असंतोष पसरला आहे. या उमेदवार व कामगारांना न्याय मिळवून देण्याकरिता तांत्रिक अप्रेंटीस असोसिएशन आता रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे. यात अकोला येथील परिमंडळ कार्यालय विद्युत भवन येथे २७ जुलै रोजी रोजी राज्यस्तरीय बेमुदत उपोषण करण्यात येणार असल्याचे अमोल पाटील व असो. च्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनात नमूद केले आहे.(कार्यालय प्रतिनिधी)
शिकाऊ उमेदवार व कंत्राटी कामगारांना वीज कंपनीने संधी द्यावी
By admin | Published: July 25, 2016 2:07 AM