अत्यल्प दराची सुविधा : जिल्ह्यातील चार शहरात सेवावर्धा : सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांनी मागणी केल्यास त्यांना २४ तासांत तात्पुरती वीज जोडणी उपलब्ध करून देण्याचा निर्णय महावितरणे घेतला आहे. जिल्ह्यातील वर्धा, आर्वी, पुलगाव आणि हिंगणघाट या शहरात ही सुविधा उपलब्ध आहे. सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांना घरगुतीपेक्षाही कमी असलेल्या ३ रुपये ७१ पैसे प्रतियुनिट सवलतीच्या दराने तात्पुरती अधिकृत वीजजोडणी घ्यावी व गणेशोत्सवासाठी वीज सुरक्षेबाबत गांर्भीयाने उपाययोजना कराव्यात असे महावितरणच्यावतीने कळविण्यात आले आहे.ज्या ठिकाणी तात्पुरती वीज जोडणी हवी आहे, त्या ठिकाणावर वीज बिलापोटी पूर्वीची कुठलीही थकबाकी नसावी, आवश्यक वीज शुल्काचा भरणा आणि वीज जोडणीसाठी आवश्यक असलेल्या सुविधा असणे आवश्यक आहे. महावितरणकडून अधिकाधिक सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांनी वीजजोडणी घ्यावी यासाठी त्यांना २४ तासांत तात्पुरती वीज जोडणी उपलब्ध करून देण्याची प्रक्रीया महावितरणने सुरू केली आहे. सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मंडप किंवा रोषणाई, देखाव्यांसाठी लागणारी वीज यंत्रणा ही अधिकृत वीज कंत्राटदारांकडूनच करावी व अर्थिंगची खबरदारी घेण्याचेही कळविले.(प्रतिनिधी)
गणेश मंडळांना २४ तासांत वीज जोडणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2016 12:18 AM