लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : येथील जिल्हा परिषदेमध्ये लाखो रुपये खर्चून लिफ्ट बसविण्यात आली. परंतु खाली पाणी साचल्याने ही लिफ्ट मागील दोन महिन्यांपासून बंदावस्थेत आहे. त्यामुळे वृद्ध व अपंगांची चांगलीच अडचण वाढली आहे.जिल्हा परिषदची इमारत ही दोन मजली असल्याने या एकाच इमारतीत तेरा विभागाचे कार्यालय आहेत. ग्रामीण भागातील विकासाची कामे याच मिनी मंत्रालयातून होत असल्याने येथे ग्रामीण भागातील नागरिकांसह स्थानिक लोकप्रतिनिंधीची मोठी वर्दळ असते. त्यामुळे जिल्हा परिषदेचे अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी व वृद्ध आणि अपंगांना पहिल्या किंवा दुसऱ्या माळ्यावर जाण्याकरिता त्रास होऊ नये म्हणून लाखो रुपये खर्चून लिफ्ट बसविण्यात आली. पण, सुरुवातीपासून या लिफ्टला ग्रहण लागले. प्रारंभी काही दिवस ही लिफ्ट बंदावस्थेत असल्यानंतर ती सुरु करण्यात आली. पण, यादरम्यान काही कर्मचारी यात अडकल्याचा प्रकार घडल्यानंतर पुन्हा काही दिवस लिफ्ट बंद ठेवण्यात आली. दुरुस्तीनंतर सुरु केल्यावर आता या पावसाळ्यात लिफ्टच्या खालच्या बाजुला पाणी साचल्याने ही लिफ्ट पुन्हा बंद करुन ठेवली आहे. सुरुवातीला हे पाणी काढण्यात आले होते. पण, पुन्हा साचल्याने ते पाणी न काढता लिफ्टची सेवाच बंद करण्यात आली. दोन महिन्यांपासून ही सेवा बंद असल्याने येथे कामानिमित्त येणाऱ्या अपंग व वृद्धांना पायऱ्या चढून पहिल्या व दुसऱ्या माळ्यावर जावे लागत आहे. त्यामुळे याकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.
झेडपीतील लिफ्ट पाण्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 11:50 PM
जिल्हा परिषदेचे अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी व वृद्ध आणि अपंगांना पहिल्या किंवा दुसऱ्या माळ्यावर जाण्याकरिता त्रास होऊ नये म्हणून लाखो रुपये खर्चून लिफ्ट बसविण्यात आली. पण, सुरुवातीपासून या लिफ्टला ग्रहण लागले. प्रारंभी काही दिवस ही लिफ्ट बंदावस्थेत असल्यानंतर ती सुरु करण्यात आली.
ठळक मुद्देदोन महिन्यांपासून सेवा ठप्प : दुर्लक्षामुळे अपंगांची वाढली अडचण