तळेगाव (श्या़पंत) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कामगार संघटनेचा मेळावा अहमदनगर येथे आयोजित होता़ या मेळाव्याला हजेरी लावण्याकरिता स्थानिक आगारातील सुमारे ७० कामगार, कर्मचाऱ्यांनी सुट्या घेतल्या़ यामुळे ४ ते ६ एप्रिल या तीन दिवसांत वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली होती़ यात परिवहन महामंडळाचे मोठे नुकसान झाले तर प्रवाश्यांचीही ताटकळ झाली़ स्थानिक आगारातून दररोज आठ हजार किमी प्रवासी वाहतूक केली जाते; पण दोन-तीन दिवस कर्मचाऱ्यांच्या रजेमुळे केवळ दोन ते अडीच हजार किमीची प्रती दिवशी प्रवासी वाहतूक करण्यात आली़ चालक, वाहक रजेवर असल्याने अनेक शेड्युल व बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या़ येथील आगारात जवळपास १०० कामगार कार्यरत आहेत. यापैकी सुमारे ७० कामगारांनी सुट्या घेतल्या होत्या़ यामुळे ही परिस्थिती ओढवली़ सध्या परिवहन महामंडळाची आर्थिक बाजू खिळखिळी झाली आहे. कामगरांनीच ही बाब समजून घेऊन परिवहन महामंडळाला बळकटी कशी आणता येईल, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे; पण तसे होताना दिसत नाही़ तळेगाव आगाराच्या इतिहासात प्रथमच आगारातून स्वतंत्र गाडी अधिवेशनाला गेली़ याचाच अर्थ एका संघटनेचे सुमारे ५० कामगार अधिवेशनाला गेले, हे निश्चित़ यामुळे प्रवासी वाहतुकीवर प्रचंड ताण आला होात़ यात प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली. एवढ्या मोठ्या प्रमाणात कामगारांना सुट्या कशा काय देण्यात आल्या, हा प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहे़ या बाबत वरिष्ठ अधिकारीही काहीच बोलण्यास तयार नसल्याने प्रवाश्यांद्वारे आश्चर्य व्यक्त केले जात आहे़(वार्ताहर)
कर्मचाऱ्यांच्या रजेमुळे कोलमडली परिवहनची प्रवासी सेवा
By admin | Published: April 08, 2015 1:53 AM